मुंबई : एअर इंडिया विमान कंपनीला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमारे २० हजार कोटी रुपये तोटा झाला आहे. वाढता तोटा कमी करण्यासाठी एअर इंडिया आपल्या विमान सेवा १५ ते २० टक्यांनी कपात करण्याच्या विचारात आहे. विमानाचे इंधन महाग झाल्यामुळे आणि ऑपरेशनल आव्हानांमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागत आहे.

युरोप आणि उत्तर अमेरिकेतील लांब पल्ल्याच्या मार्गांवर ही कपात प्रामुख्याने केंद्रित असू शकते. विमान फेऱ्या कमी झाल्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विमान तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रस्तावित कपातीमुळे एअर इंडिया ग्रुपच्या सुमारे १,१०० दैनंदिन विमानांपैकी १०० हून अधिक उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो. या निर्णयाचा उद्देश शेड्यूलमध्ये स्थिरता आणणे आणि शेवटच्या क्षणी होणारा प्रवाशांचा त्रास कमी करणे हा आहे. एअर इंडिया विमान कंपनी सध्या स्वतंत्रपणे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर दररोज ७०० हून अधिक उड्डाणे चालवते.

वाढत्या विमान इंधनाच्या किमती, हवाई मार्गातील बदलांमुळे वाढलेला उड्डाणाचा कालावधी आणि परदेशी मार्गांवरील वाढता वाहतूक खर्च यामुळे विमान कंपन्यांचा आर्थिक तोटा वाढत आहे. परिणामी, विमान कंपन्या आपल्या नेटवर्क-व्यापी कपातीचे मूल्यांकन करत आहेत. संपूर्ण नेटवर्कवर वाहतूक खर्च वाढत असल्याने एअर इंडिया विमान सेवांमध्ये लक्षणीय कपात करण्याचा विचार करत आहे. एअर इंडियाची कपात १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, तर एअर इंडिया एक्स्प्रेसची कपात १० ते १५ टक्क्यांपर्यंत असू शकते.

आंतरराष्ट्रीय मार्गांवर सर्वात मोठी कपात

प्रस्तावित कपात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सेवांवर, विशेषतः युरोप आणि उत्तर अमेरिकेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर होण्याची शक्यता आहे.

फेऱ्यांवर मर्यादा

मार्गातील बदलांमुळे अनेक मार्गांवरील उड्डाणाचा कालावधी वाढला आहे. विमाने एकाच मार्गावर अधिक वेळ हवेत घालवत आहेत. परिणामी, वेळापत्रक कोलमडत असल्याने विमाने फेऱ्यांची संख्या कमी होत आहे.

वाढलेल्या विमान

इंधनाच्या किमतींमुळे विमान कंपन्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणखी ताण आला आहे. विमान कंपन्यांसाठी इंधन हा सर्वात मोठ्या खर्चाच्या घटकांपैकी एक आहे. किमतींमधील सातत्यपूर्ण वाढीमुळे मार्गांची व्यवहार्यता आणि फेऱ्यांच्या नियोजनाचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज निर्माण झाली आहे.