मलेशियाचे विमान पाडण्यात आल्यामुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिलेल्या आदेशानुसार, एअर इंडिया आणि जेट एअरवेजची विमाने युद्धग्रस्त युक्रेनच्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्याचे टाळणार आहेत.
युरोप आणि उत्तर अमेरिकेत एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्याच विमानांचे उड्डाण होते, त्यामुळे तेथे जाताना अथवा परतताना युक्रेनची हवाई हद्द टाळण्याचे आदेश महासंचालनालयाने दिले आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. युक्रेनसारख्या कोणत्याही क्षेत्रातून उड्डाण करण्याचे आम्ही टाळणार असून आदेशांचे पालन करणार आहोत, असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिका आणि युरोपला जाण्यासाठी अन्य मार्गही आहेत, त्यामुळे विमान कंपन्यांना आदेशांचे पालन करावेच लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
कामाची वेळ बदलणे जिवावर बेतले
भारतीय वंशाचा कर्मचारी संजिदसिंग संधू याने सहकाऱ्यासमवेत कामाची वेळ बदलून घेतली आणि तो एमएच-१७ या विमानात सेवेसाठी गेला आणि तेच विमान पाडण्यात आल्याने संधू याचा दुर्दैवी अंत झाला, अशी माहिती हाती आली आहे.संधू याच्या आईने त्याच्या आवडीचा पदार्थ बनविण्याचे ठरविले होते, संधू याचे त्याबाबत आईशी बोलणेही झाले होते, मात्र सूनबाईंकडूनच ही दुर्दैवी बातमी आम्हाला समजली, असे संधूचे वडील जिजारसिंग यांनी सांगितले.
विमानाचा मार्ग योग्य -मलेशियाचा दावा
सदर विमान आपल्या नियोजित मार्गावरूनच जात होते आणि विमानातील कार्यप्रणाली उत्तमपणे कार्यरत होती, असा दावा मलेशियाच्या मंत्र्यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेने आखून दिलेल्या मार्गावरूनच विमान जात होते आणि तो मार्ग प्रतिबंधित नव्हता, असे मलेशियाचे परिवहनमंत्री तिआँग लाई यांनी सांगितले.