Air India New Health and Fitness Compliance Policy for Crew Members : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने आपल्या केबिन क्रू सदस्यांसाठी एक नवीन आणि अत्यंत कडक आरोग्य व फिटनेस नियमावली (Health and Fitness Compliance Policy) जाहीर केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन झाल्यास कर्मचाऱ्यांना ड्युटीवरून हटवले जाऊ शकते किंवा त्यांच्या पगारात कपात केली जाऊ शकते.
एअर इंडियाने आपल्या केबिन क्रूसाठी नवीन फिटनेस नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली १ मे पासून लागू होईल. ज्या कर्मचाऱ्यांचे वजन (BMI) विहित मर्यादेबाहेर असेल, त्यांना कामावरून हटवले जाऊ शकते किंवा त्यांचा पगारही कापला जाऊ शकतो. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
BMI आणि फिटनेसनुसार वर्गीकरण
सामान्य (१८ ते २४.९): ही श्रेणी ‘नॉर्मल’ आणि अपेक्षित मानली गेली आहे.
कमी वजन (१८ पेक्षा कमी): हे स्वीकारार्ह असू शकते, मात्र त्यासाठी वैद्यकीय चाचणी आणि फिटनेस मूल्यांकन उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
जास्त वजन (२५ ते २९.९): या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना फिटनेस चाचणी द्यावी लागेल. ती उत्तीर्ण झाल्यास त्यांना कामावर राहता येईल.
लठ्ठपणा (३० किंवा त्यापेक्षा जास्त): ही श्रेणी पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून हटवून त्यांचा पगार बंद केला जाईल. त्यांना ठराविक काळात वजन कमी करणे बंधनकारक असेल.
दंडात्मक कारवाई
जे कर्मचारी फिटनेस चाचणीत नापास होतील किंवा ‘लठ्ठ’ श्रेणीत येतील, त्यांना पगार दिला जाणार नाही (Loss of Pay). वजन मर्यादेत आल्यानंतरच त्यांना पुन्हा कामावर घेतले जाईल. टाटा समूहाने एअर इंडियाची सूत्रे हाती घेतल्यापासून कंपनीत अनेक मोठे बदल केले जात आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जागतिक दर्जाचे फिटनेस मानक प्रस्थापित करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. हे नियम सध्या कार्यरत असलेल्या आणि प्रशिक्षण घेत असलेल्या अशा दोन्ही कर्मचाऱ्यांना लागू असतील.
