Air India Controversy: एअर इंडियाच्या नवी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को विमान प्रवासात विमानाच्या क्रूच्या एका क्षुल्लक चुकीमुळे प्रवाशाला भयंकर त्रास व वेदना सहन कराव्या लागल्याचे समजतेय. नवी दिल्लीहून यूएसकडे निघालेल्या चारू तोमर यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती देत सांगितले की फ्लाइट अटेंडंटने त्यांच्या पायावर गरम पाणी सांडलं ज्यामुळे त्यांचा पाय भाजून सेकेंड डिग्री बर्न सहन करावे लागले. विशेष म्हणजे इतक्या भयंकर चुकीनंतर विमानाच्या क्रूने महिला प्रवाशाला होणाऱ्या वेदनांकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. याबद्दल माहिती देताना चारू तोमर यांनी संताप व्यक्त केला आहे. नेमका त्यांचा आरोप काय आहे हे पाहूया.. चारू तोमर या त्यांचा चार वर्षांचा मुलगा आणि ८३ वर्षीय सासूसह प्रवास करत होत्या. विमानात जेवण वाटले जात असताना एक क्रू मेंबरच्या चुकीमुळे चारू यांच्या पायावर गरम पाणी सांडलं. यामुळे चारू यांना प्रचंड वेदना व त्रास होऊ लागला. ज्यावर संबंधित क्रू मेंबरने चक्क दुर्लक्ष केलं. चारू यांनी निदान आपल्याला कूलिंग एजंट (थंड पाण्याची पिशवी किंवा कापड/बर्फ) देण्यात यावा अशी विनंती केल्यावरही क्रूने अत्यंत संथ गती दाखवत वेळकाढूपणा केला. अखेरीस न राहवल्याने चारू यांनी जेव्हा मदतीसाठी आरडाओरडा केला तेव्हा विमानातील डॉक्टरांकडून त्यांना वैद्यकीय मदत देऊ करण्यात आली. सेकंड-डिग्री बर्न झाल्याचे निदान होताच त्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा फ्लाइटमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य नव्हते. सुमारे दोन तास वेदनेने कळवळत असताना चारू यांना वेदनाशामक औषध किंवा योग्य प्रथमोपचार सुद्धा देण्यात आला नव्हता. चारू तोमर यांनी सांगितले की, हद्द तर तेव्हा झाली जेव्हा लँडिंग केल्यावरही चारू यांना होणाऱ्या त्रासापेक्षा क्रूला आपलं काम आटपण्याची जास्त घाई होती. रडून मदत मागितल्यावर शेवटी त्यांना पॅरामेडिक्सच्या पथकाने बाहेर काढले. पण तेव्हा त्यांच्या कुटुंबातील ८३ व ४ वर्षीय सदस्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यांना नेमकं काय घडतंय याचीही माहिती दिली गेली नव्हती. या सगळ्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला होता. याविषयी चारू तोमर यांनी आपल्या (X) पेजवर सविस्तर अनुभव सांगितला आहे. हे ही वाचा<< ”ताई, तुला मानाचा मुजरा”, एका हातानेच ढोल वादन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी तिच्या जिद्दीचे केले कौतूक दरम्यान, चारू यांनी पोस्ट करताना यात एअर इंडियाला टॅग केले होते ज्यामुळे याची दखल घेत एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र प्रथमोपचार न देण्याबाबतचा दावा एअरलाईनने फेटाळून लावला आहे. माफी मागताना एअर इंडियाने संबंधित दुखापतग्रस्त प्रवाशाला सर्वतोपरी मदत केली जाईल व या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे असेही सांगितले आहे.