Air India Phuket Delhi flight captain dope test : थायलंडमधील फुकेत येथून राजधानी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानात ४ ऑगस्ट रोजी प्रवासादरम्यान एक थरारक आणि धडकी भरवणारी घटना घडली. अचानक हवेचा वेग, दाब किंवा दिशा बदलल्यामुळे (Turbulence) हे विमान हवेतच तब्बल ३०० फूट खाली आले. हे विमान दिल्लीत पोहोचल्यावर विमानाचे कॅप्टन अंमली पदार्थ (डोप) चाचणीत दोषी आढळल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विमान कंपनीने या वृत्ताला दुजोरा किंवा नकार दिला नसून, चाचणीचे निकाल अद्याप मिळालेले नसल्याचं म्हटलं आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “लागू नियमांनुसार वैमानिकांची उड्डाण-उत्तर चाचणी करण्यात आली होती. मात्र, याचे निकाल आमच्याशी सामायिक केलेले नसल्याने आम्ही यावर भाष्य करू शकत नाही.”
१४५ प्रवाशांसह प्रवास करणारे हे एअरबस ए३२० विमान ओदिशाजवळ भीषण संकटात अडकले आणि अचानक ३०० फूट खाली आले. दिल्लीत उतरल्यानंतर १३ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्सना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या घटनेची चौकशी करत असून, वैमानिकांची तात्पुरती ड्युटी थांबवण्यात आली आहे. DGCA नियमांनुसार, पहिल्यांदा दोषी आढळल्यास वैमानिकाला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं जातं. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास परवाना ३ वर्षांसाठी निलंबित होतो, तर तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास परवाना कायमचा रद्द केला जातो.
नेमकं काय घडलं होतं?
थायलंड येथील फुकेतहून ४ ऑगस्ट रोजी, मंगळवारी सकाळी ८.२५ च्या सुमारास एअर इंडियाचे विमान दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०७ च्या सुमारास विमान दिल्ली विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. विमान दिल्ली विमानतळावर उतरण्यासाठी सज्ज होत असताना तीव्र टर्बुलेंसमुळे (अचानक हवेत विमान खाली सरकणे) झालेल्या धक्क्यामुळे
विमान खाली आले. विमान अचानक खाली आल्याने विमानाच्या छताला प्रवासी धडकले. यात १० प्रवासी आणि ४ कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. दिल्लीत विमान उतरण्यापूर्वी काही वेळेआधीच ते अचानक खाली येऊ लागले आणि हवेत जोरात डगेमगू लागले. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी आरडाओरड केला. काही वेळासाठी विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैमानिकाने मोठ्या कौशल्याने आणि धैर्याने विमान सुरक्षित उतरविले
