एअर इंडियाचं एक विमान निर्धारित उड्डाणाच्या उंचीवरून अचानक ३०० फूट खाली आल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी घडली होती. हे विमान थायलंड येथील फुकेतहून ४ ऑगस्ट रोजी दिल्लीकडे येत होतं. यावेळी एअर इंडियाचं एआय २३७९ हे विमान अचानक ३०० फूट खाली आल्याच्या घटनेची एअर इंडियाने गंभीर दखल घेतली होती. सदर वैमानिकाने अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता एअर इंडियाने सदर वैमानिकाला सेवेतून बडतर्फ केले आहे.
“सुरक्षेला एअर इंडियाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. फुकेत-दिल्ली विमानातील वैमानिकाच्या शरीरात मादक पदार्थ आढळल्याची चाचणी सकारात्मक आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबाबत सदर वैमानिकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येत आहे”, अशी माहिती एअर इंडियाने निवेदनाच्या माध्यमातून दिली आहे.
प्रकरण काय आहे?
४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत काही प्रवाशांना धक्के बसले होते आणि काही प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर हे विमान दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर केलेल्या प्राथमिक व त्यानंतरच्या प्रयोगशाळेतील चाचणीत मुख्य वैमानिकांची अमली पदार्थ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चा प्राथमिक अहवाल समोर आला असून या अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. एअर इंडियाच्या फुकेट-दिल्ली विमानाबाबतचा प्राथमिक अहवाल एएआयबीने प्रसिद्ध करत डीजीसीएकडे महत्वाची शिफारस केली आहे.
एएआयबीच्या अहवालानुसार, मुख्य वैमानिकाच्या शरीरात अमली पदार्थांचे सेवन झाल्याचं चाचणीत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे अमली पदार्थांच्या सेवनाची पुष्टी होणं ही एक गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या विमानाच्या घटनेच्या तांत्रिक निष्कर्षांबरोबरच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने डीजीसीएला (DGCA) पायलट-इन-कमांडवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
एएआयबीने अहवालात काय म्हटलं?
एएआयबीच्या अहवालानुसार, हे विमान ३६,००० फूट उंचीवरून प्रवास करत असताना अवघ्या काही सेकंदांतच तिन्ही हायड्रॉलिक प्रणालींमधील (ग्रीन, ब्लू आणि यलो) दाब नाहीसा झाला होता. यामुळे ऑटोपायलट बंद झालं होतं, ‘स्टॉल वॉर्निंग’ (विमानाचा वेग अपुरा पडल्याचा इशारा) सक्रिय झालं आणि विमानाची उंची अचानक खाली आली. अहवालानुसार, उड्डाणानंतर दोन्ही वैमानिकांची ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी करण्यात आली होती आणि त्याचे निष्कर्ष समाधानकारक होते. मात्र, त्यानंतर ‘सायकोॲक्टिव्ह पदार्थांसाठी केलेल्या चाचणीत मुख्य वैमानिकाचा अहवाल ‘नॉन-निगेटिव्ह’ (सकारात्मक) आला आहे. ज्याला नंतर प्रयोगशाळेतील रक्त चाचणीद्वारे दुजोरा मिळाला असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
थायलंड येथील फुकेतहून ४ ऑगस्ट रोजी मंगळवारी सकाळी ८.२५ च्या सुमारास एअर इंडियाचं विमान दिल्लीच्या दिशेने रवाना झालं होतं. नियोजित वेळेनुसार सकाळी ११.०७ च्या सुमारास विमान दिल्ली विमानतळावर उतरणं अपेक्षित होतं. विमान दिल्ली विमानतळावर उतरण्यासाठी सज्ज होत असताना तीव्र टर्बुलेंसमुळे (अचानक हवेत विमान खाली सरकणे) झालेल्या धक्क्यामुळे विमान खाली आलं होतं. विमान अचानक खाली आल्याने विमानाच्या छताला प्रवासी धडकले. यात १० प्रवासी आणि ४ कर्मचारी जखमी झाले होते. सुदैवाने हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आलं होतं. दिल्लीत विमान उतरण्यापूर्वी काही वेळेआधीच ते अचानक खाली येऊ लागलं होतं आणि हवेत जोरात डगेमगू लागलं होतं. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रवाशांनी आरडाओरड केला. काही वेळासाठी विमानात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र वैमानिकाने मोठ्या कौशल्याने आणि धैर्याने विमान सुरक्षित उतरविलं होतं.
