एअर इंडियाच्या वैमानिकाचा मृतदेह दिल्लीतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आढळून आला आहे. याबाबत एअर इंडियाने जी माहिती दिली की अशी की त्यांचा एक वैमानिक दुसऱ्या दिवशी फ्लाईट घेऊन जाणार होता. त्यामुळे हा वैमानिक वसंत कुंज येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला होता. १० सप्टेंबरला त्याने चेक इन केलं. मात्र ११ सप्टेंबरच्या संध्याकाळी तो कुठलाही प्रतिसाद देईना. ज्यानंतर मास्टर की ने त्याच्या रुमचा दरवाजा उघडण्यात आला. ज्यानंतर हा वैमानिक बेशुद्ध आहे असं हॉटेल स्टाफला वाटलं. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमकी घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० सप्टेंबरला सनी असालडेकर या वैमानिकाने दिल्लीतल्या वसंतकुंज भागात असलेल्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. ११ तारखेला त्यांना फोन करण्यात येत होते. पण त्यांनी एका फोनचं उत्तर दिलं नाही. ज्यानंतर मॅनेजरने स्वतः जाऊन रुमचा दरवाजा वाजवला. मात्र ती रुम आतून बंद होती. ज्यानंतर मॅनेजरने मास्टर की घेऊन येत दरवाजा उघडला. त्यावेळी हा पायलट बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी तातडीने सनी या वैमानिकाला सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तिथे त्याला मृत घोषित केलं.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला पाचारण

सदर घटनेनंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. १२ सप्टेंबरला या वैमानिकाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. या पायलटचा मृत्यू का झाला ते या अहवालानंतरच समजू शकणार आहे. वसंत कुंज नॉर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी कलम १९४ अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आलं असून तपास सुरु करण्यात आला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

एअर इंडियाने या घटनेबाबत नेमकं काय म्हटलं आहे?

सनी या वैमानिकाने एअर इंडिया एक्स्प्रेससह काम केलं होतं. काही महिन्यांपूर्वीच सनी एअर इंडियामध्ये नोकरी करु लागला होता. आमच्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याने आम्ही दुःखी आहोत तसंच सनी यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. शनिवारी सकाळी सनी एक विमान घेऊन उड्डाण करणार होता. मात्र त्याआधीच ही घटना घडली. आम्ही त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत असं एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.