Air India Pilot Drug Test Positive news : फुकेत-दिल्ली विमानातील दुर्घटनेनंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाचे आणखी दोन वैमानिक प्राथमिक अंमली पदार्थ चाचणीत अपयशी ठरले आहेत. अंतिम चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा असून दोन्ही वैमानिकांना सध्या सेवेतून तात्पुरते हटवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एअर इंडियाच्या दोन वैमानिकांची चाचणी पॉझिटिव्ही
फुकेत-दिल्ली विमानाचं लँडिंग झाल्यानंतर मुख्य वैमानिकाची लघवीची चाचणी घेण्यात आली होती. या दोन्ही चाचण्यांमध्ये तो अपयशी ठरला आणि त्याच्या शरीरात गांजा आढळला. या घटनेनंतर एअर इंडियाने नवीन मानक संचालन प्रक्रियेचा भाग म्हणून सर्व वैमानिकांना ड्रग टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत एअर इंडियाच्या ३०० हून अधिक वैमानिकांची ही चाचणी पूर्ण झाली आहे. अंतिम चाचणीचा निकाल येण्यासाठी साधारण २४ ते ४८ तास लागतात. यामध्ये दोन वैमानिकांचा प्राथमिक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही वैमानिकांना कामावरून कमी करण्यात आले असून, अंतिम चाचणीचे निकाल येईपर्यंत ते उड्डाण कर्तव्यापासून दूर राहतील, असं सूत्रांनी सांगितलं.
फुकेत-दिल्ली विमानात नेमकं काय घडलं?
संबंधित विमानातील एका केबिन क्रू सदस्याने मुख्य वैमानिकाने विमान उडवण्यापूर्वी गांजा ओढल्याची तक्रार केल्याचं समोर आलं आहे. ज्या विमानामुळे एअरलाइन प्रशासनाला ही पावले उचलावी लागली, ते ‘एअरबस ए-३२० निओ’ मॉडेलचे होते. हे विमान अचानक ३०० फूट खाली कोसळले होते. विमान यंत्रणेच्या नोंदीनुसार, हायड्रॉलिक निकामी झाल्यामुळे ४ सेकंदांसाठी एलिव्हेटर्स (elevators), आयलिरॉन्स (ailerons) आणि स्पॉयलर्स (spoilers) यांसारख्या मुख्य नियंत्रण भागांवरील ताबा पूर्णपणे सुटला होता. यादरम्यान वैमानिकाने कोणतीही कमांड न देता हे भाग स्वतःहून हलत होते. या विमानातील तीनही हायड्रॉलिक यंत्रणा एकाच वेळी निकामी होण्याची ही पहिलीच अभूतपूर्व घटना आहे.
विमानाचे नाक वर-खाली करण्यासाठी (एलिव्हेटर्स), विमान डावीकडे किंवा उजवीकडे वळवण्यासाठी (आयलिरॉन्स) आणि विमानाचा वेग कमी करण्यासाठी (स्पॉयलर्स) हायड्रॉलिक यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते. सुरुवातीला ही घटना हवेतील खराब वातावरणामुळे झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, विमान यंत्रणेच्या डेटावरून सत्य समोर आलं. दरम्यान, एअर इंडियाने स्पष्ट केलं की, ते कोणत्याही विशिष्ट घटनेवर अवलंबून न राहता, नागरी विमान वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियमित ड्रग टेस्ट करत असतात.
