Air India Pilot Alcohol Test : गेल्या काही दिवसांपूर्वी ‘एअर इंडिया’च्या फुकेत-दिल्ली या विमानात एक थरारक आणि धडकी भरवणारी घटना घडली होती. विमान हवेतच तब्बल ३०० फूट खाली आलं होतं, त्यामुळे विमानात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली होती. यामध्ये काही प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर आली होती. वैमानिकाने अंमली पदार्थाचं सेवन केल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर एअर इंडियाकडून संबंधित वैमानिकावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.
आता अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या एका सह-वैमानिकाला निलंबित करण्यात आलं आहे. ६ सप्टेंबर रोजी एअर इंडियाच्या झ्युरिक-दिल्ली विमानप्रवासापूर्वी संबंधित वैमानिक अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरला. त्यामुळे या वैमानिकावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
विमानाच्या उड्डाणाच्या काही वेळ आधी या वैमानिकाला झ्युरिक विमानतळावर उतरवण्यात आलं आणि प्रवासी म्हणून थेट भारतात पाठवण्यात आलं आहे. या वैमानिकाने मद्यपान केलेलं असावं असा संशय आल्याने अधिकाऱ्यांनी या वैमानिकाला विमानातून उतरवलं. तो अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरला असून अद्याप दुसऱ्या एका चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
अंतिम वैद्यकीय तपासणी अहवाल येईपर्यंत हा वैमानिक निलंबित राहणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. अंतिम वैद्यकीय अहवाल आल्यानंतर चौकशी केली जाईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. मात्र, तोपर्यंत संबंधित वैमानिकाचं निलंबन कायम राहील, असं एअर इंडियाने सांगितलं आहे. तसेच नियमांच्या उल्लंघनाची पुष्टी झाल्यास कंपनीच्या धोरणानुसार संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
