Air India Plane Crash Costliest Insurance Claim : अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात असतानाच याच्या विम्याबाबतचे वेगवेगळे दावे माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. या अपघातानंकर एअर इंडिया ही कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा इन्शुरन्स क्लेम (विमा दावा) करू शकते. तसेच हा भारतातील सर्वात मोठा इन्शुरन्स क्लेम देखील असू शकतो.
तज्ज्ञांच्या हवाल्याने इकोनॉमिक टाइम्सने दावा केला आहे की एअर इंडिया कंपनी या अपघाताशी संबंधित जो इन्शुरन्स क्लेम करेल त्याची रक्कम अंदाजे १२० मिलियन डॉलर्सहून (जवळपास १०,३३,०२,२२,७८८ रुपये) अधिक असू शकते.
इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होतात?
विमान कंपन्या साधारणपणे हुल इन्शुरन्स, स्पेअर पार्ट्स इन्शुरन्स व लीगल लायबिलिटी म्हणजेच कायदेशीर जबाबदाऱ्यांसाठी इन्शुरन्स काढतात. अहमदाबादमधील विमान अपघाताच्या बाबतीत एअर इंडिया कंपनी तिन्ही गोष्टी क्लेम करू शकते. विमानाचं नुकसान व प्रवाशांचे मृत्यू या दोन्ही गोष्टी इन्शुरन्स कव्हरमध्ये येतात.
जीटीसी आरईचे (GTE Re) चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणन म्हणाले, “अशा दुर्घटनांमध्ये विमानाची जाहीर रक्कम (एअरक्राफ्ट्स डिक्लेअर्ड व्हॅल्यू) इन्शुरन्स कंपनीला सांगावी लागते. त्याच आधारावर नुकसानाची रक्कम ठरवली जाते”.
विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू
एअर इंडियाचं अहमदाबाद-लंडन विमान गुरुवारी (१२ जून) दुपारी पावणे दोनच्या सुपारास सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाच्या सीमेजवळ कोसळळं. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावरून २६५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या विमानात १२ क्रू सदस्यांसह एकूण २४२ प्रवासी होते. त्यांच्यापैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. तर, उर्वरित २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच हे विमान अहमदाबादमधील मेघानी नगरमधील रहिवासी भागात (डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या इमारतीवर) कोसळल्यामुळे वस्तीतही मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. विमान कोसळल्यामुळे मेघानी नगरमधील २४ रहिवासी मृत्यूमुखी पडले आहेत.