Air India Plane Crash Ahmedabad survivor Vishwas Kumar shares trauma: गेल्या वर्षी अहमदाबाद येथे १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. भारतातील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात म्हणून याची नोंद केली जाईल. लंडनसाठी एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात विमान कोसळले. अपघाताला एक वर्ष झाल्यानंतरही अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही. एकूण २६० जणांचा अपघातात मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांच्या जखमा मात्र अजूनही ओल्या आहेत. या अपघातामधून एकमेव सुखरूप वाचलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश हेदेखील मानसिक धक्क्यात आहेत. अपघाताच्या वर्षपूर्तीनिमित्त विश्वास कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘मी रोज ते दुःख भोगतो’

एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर ११ए या सीटवर बसलेले ३९ वर्षीय विश्वास कुमार सुखरूप वाचले. त्यादिवसापासून विश्वास कुमार त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना ते म्हणाले, “मला नाही वाटत की, मला पूर्ण शांतता कधी लाभेल. माझ्याबरोबर जे घडले, मी जे काही गमावले, त्याबरोबरच मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस जगावा लागेल.”

विश्वास कुमार पुढे म्हणाले, “विमान अपघाताला वर्ष पूर्ण झाले असले तरी मी अजून त्याच कटू आठवणीत आहे. लोक मला चमत्कारी म्हणतात. कारण मी २६० लोकांमधून एकटा जिवंत वाचलो. पण खरं सांगायचे तर जिवंत राहण्याची किंमत मला रोज भोगावी लागते.”

आजही जेव्हा डोळे मिटतात, तेव्हा माझ्यासमोर १२ जून २०२५ चा तो दिवस उभा राहतो. लोकांचे मदतीसाठी किंचाळण्याचे आवाज, आगीचा भडका डोळ्यासमोर दिसतो. मी अपघातातून वाचलो पण यातून मनावर मात्र मोठा आघात झाला, असेही विश्वास कुमार म्हणाले.

air-india-plane-crash-ahmedabad-survivor
उजवीकडे विश्वास कुमार रमेश आणि डावीकडे त्यांचे प्रतिनिधी संजीव पटेल. (Photo – TIEPL Special Arrangement)

मुळचे गुजरातमधील दिव येथील असलेले विश्वास कुमार ब्रिटन नागरिक आहेत. विमान अपघाताला एक वर्ष होत असताना द इंडियन एक्सप्रेसने त्यांच्याशी संवाद साधला. विश्वास कुमार यांचे वैयक्तिक प्रतिनिधी आणि सल्लागार संजीव पटेल यांच्यामार्फत हा संवाद साधला गेला. लेस्टर शहरातील रहिवासी आणि मोटीव्हेशनल स्पीकर असलेल्या संजीव पटेल यांनीही विश्वास कुमार यांच्या स्थितीची माहिती दिली.

विश्वास कुमार रमेश हे १२ जून रोजी त्यांचा लहान भाऊ अजय (३५) याच्यासह प्रवास करत होते. दुर्दैवाने त्यांच्या भावाचे अपघातामध्ये निधन झाले. विश्वास कुमार रमेश म्हणाले की, अपघाताच्या अंतिम तपासणी अहवालाची वाट पाहत आहे. त्यातूनच त्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. ते म्हणाले, “अहवाल आल्यानंतर हा अपघात का घडला, हे आम्हालाही कळू शकेल आणि भविष्यात असे अपघात होऊ नयेत, याची काळजी घेता येईल.”

प्राथमिक अहवालातून कोणते कारण समोर आले?

एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर महिन्याभरातच एअर ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (एएआयबी) प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. यात दोन्ही इंजिन्सना होणारा इंधनपुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे ती बंद पडली. त्यामुळे उड्डाण घेत असताना आवश्यक ती ताकद (थ्रस्ट) विमानाला मिळालीच नाही आणि मिनिटभरातच ते कोसळले, असे नमूद केले आहे.

पण हा अहवाल अपुरा असून तो घाईने लिहिण्यात आल्याची टीका त्यावेळी झाली. कोणत्याही दुर्घटनेनंतर ३० दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल आणि एका वर्षाच्या आत अंतिम अहवाल सादर करणे जेथे अपघात घडला त्या देशावर बंधनकारक असते. त्यानुसार ११ जुलैच्या मध्यरात्री, घटनेस ३० दिवसांची मुदत संपण्याच्या वेळी प्राथमिक अहवाल जाहीर झाला.

air india plane crashed one passenger survived
भीषण विमान अपघातामधून ११अ सीटवर बसलेले रमेश विश्वासकुमार सुखरुप वाचले

मागच्या महिन्यात नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटले होते की, अंतिम अहवाल तयार करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. महिन्याभरात अहवाल प्राप्त होईल. शक्यतो तो १२ जून रोजी प्रसिद्ध होऊ शकतो.

विश्वास कुमार रमेश कसे वाचले?

विश्वास कुमार यांचे कुटुंबीय ब्रिटनला स्थायिक होण्यापूर्वी दिव येथे मासेमारीचा व्यवसाय करत होते. विश्वास कुमार रमेश चार भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. इंग्लंडमधील लेस्टर शहरात ते पत्नी हिरल, पाच वर्षांचा मुलगा दिवांग आणि पालक रमेशभाई आणि जयाबेन यांच्यासह राहतात. लहान भाऊ नयनही त्यांच्याबरोबर राहतो. तर तिसरा भाऊ सनी दिवमध्ये आहे.

ज्यादिवशी अपघात झाला, त्यावेळी विश्वास कुमार आपत्कालीन दरवाजाजवळ बसले होते. एअर इंडियाचे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले. त्यानंतर आगीचे मोठे लोळ दिसून आले. अपघाताच्या ठिकाणाहून विश्वास कुमार एकटेच चालत येताना बचाव पथकाला दिसले. त्यानंतर त्यांना अहमदाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ahmedabad plane crash updates air india flight boing accident deadbodies
थिजलेले डोळे आणि भिजलेल्या मनांनिशी मृतदेहाची वाट पाहणारे नातेवाईक; अहमदाबादच्या रुग्णालयातील विदारक दृश्य!

किती लाखांची मदत मिळाली?

अपघातानंतर विश्वास कुमार यांच्या कुटुंबियांना इतर पीडितांप्रमाणेच एअर इंडियाकडून २५ लाखांची मदत मिळाली. तसेच विश्वास यांच्या उपचाराचा खर्चही एअर इंडियाने केला. संजीव पटेल म्हणाले की, ज्या लोकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती अपघातात गमावली, अशा डझनभर लोकांना मदत मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. एअर इंडिया अपघातात २६० लोकांचा मृत्यू झाला. ज्यात ५२ ब्रिटनचे नागरिक होते.

विश्वास यांचे कुटुंबीय ब्रिटनमधील हजगेल सॉलिसिटर्सचीही मदत घेत आहे. मदतीबाबत बोलताना संजीव पटेल म्हणाले, विश्वास यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी जी मदत दिली गेली, त्याबाबत आम्ही समाधानी आहोत. पण आम्हाला आणखी आर्थिक मदत मिळावी. विश्वासच्या आयुष्यावर मोठा आघात झाला आहे. त्याची भरपाई करणे अवघड आहे. आमची आशा आहे की, यावर चांगला तोडगा निघावा. विश्वासचे कुटुंब ज्या अवघड परिस्थितीतून जात आहे, त्यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य मिळणे आवश्यक आहे.