Air India Service : एअर इंडियाच्या सेवेबाबत अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. विमानातील आसनव्यवस्था नीट नसण्यापासून वृद्ध प्रवाशांना व्हिलचेअर नाकारण्यापर्यंत अनेक घटनांमुळे एअर इंडियावर टीका केली जाते. आता त्यांच्या याच असुविधेमुळे एका ८२ वर्षीय वृद्ध महिला प्रवाशाला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं आहे. तिच्या नाकाला आणि डोक्याला जबर मार लागला असून गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये निरिक्षणाखाली आहेत. त्यांची नात पारूल कंवर यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे.
महिलेच्या नातीने आरोप केला आहे की आजीच्या ओठातून रक्त येत असतानाही तिला प्रथमोपचार देण्यात आले नाहीत. डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली होती. अखेर शेवटी तिच्यासाठी व्हिलचेअर पाठवण्यात आली. शुक्रवारी पहाटे २ वाजता शेवटचे संपादित केलेल्या X वरील पोस्टमध्ये त्यांची नात पारुल कंवर यांनी लिहिले की त्यांनी मंगळवारी दिल्ली ते बेंगळुरू एअर इंडियाचे विमान (AI2600) बुक केले होते. प्रवाशांमध्ये त्यांची ८२ वर्षांची आजी होती. ज्यांनी भारताच्या विविध युद्धांमध्ये आपलं शौर्य दाखवलं आहे अशा लेफ्टनंटच्या त्या पत्नी आहेत. राज पसरीचा असं या आजींचं नाव आहे. तिकिटावर “विमानाच्या दारापर्यंत व्हीलचेअर” साठी विशेष विनंतीचा उल्लेख आहे आणि त्यांची विनंतीही मान्य करण्यात आली होती.
“मी हे पोस्ट करत आहे कारण माझ्याकडे पर्याय नाही. मानवी जीवन आणि कल्याणासाठी इतके कमी मूल्य आहे याचा मला राग येतो”, असे स्पष्टपणे संतापलेल्या कंवर यांनी लिहिले. कंवर यांनी म्हटलं की, जेव्हा ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ (टी३) वर पोहोचले तेव्हा त्यांना व्हीलचेअर देण्यात आली नाही. कुटुंबाने एक तास प्रयत्न केला आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना, विमानतळ मदत केंद्राला तसेच दुसऱ्या एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांना विनंती केली, परंतु व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली नाही.”
“दुसरा कोणताही पर्याय नसल्याने या वृद्ध महिलेने कुटुंबातील एका सदस्याच्या मदतीने T3 नवी दिल्ली येथील ३ पार्किंग लेन पायी ओलांडले. ती पायीच विमानतळावर प्रवेश करण्यात यशस्वी झाली, तरीही व्हीलचेअर किंवा मदत देण्यात आली नाही. शेवटी, ती दमली आणि कोसळली. ती एअर इंडियाच्या प्रीमियम इकॉनॉमी काउंटरसमोर पडली. तरीही मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. आम्ही कोणालातरी प्रथमोपचार मिळावा अशी विनंती केली, पण मदत मिळाली नाही”, अशी आपबिती कंवर यांनी सांगितली.
“कुटुंबातील सदस्यांनी एमआय (वैद्यकीय तपासणी) कक्षात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी अशी अपेक्षा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांची होती. तिच्या ओठातून रक्त येत होतं, डोक्याला आणि नाकाला डोक्याला दुखापत झाल्यानंतर व्हिलचेअर आली. तिच्यावर कोणतेही उपचार न करता जखमीअवस्थेतच तिला विमानात बसवण्यात आलं. विमानातील कर्मचाऱ्यांनी आईस पॅक लावले आणि वैद्यकीय मदतीसाठी बंगळुरू विमानतळाशी संपर्क साधला. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले आणि तिला २ टाके लावले”, असं नातीनं सांगितलं.
कंवर म्हणाल्या की, त्या आयसीयूमधून पोस्ट टाइप करत होत्या. तिथेच त्यांच्या आजीवर उपचार सुरू होते. आजीच्या डाव्या बाजूची शक्त कमी झाली होती, असंही त्या म्हणाल्या. यासंदर्भात त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि एअर इंडियाकडे तक्रारी केल्या आहेत.
एअर इंडियाचा प्रतिसाद
कंवर यांच्या पोस्टला उत्तर देताना एअर इंडियाच्या हँडलवर लिहिले आहे की, “प्रिय कंवर, आम्हाला हे लक्षात घेऊन काळजी वाटते आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी आमची इच्छा आहे. या संदर्भात आम्ही तुमच्याशी फोनवरून संपर्क साधू इच्छितो आणि तुमचा संपर्क क्रमांक आणि सोयीस्कर वेळ DM (डायरेक्ट मेसेज) द्वारे शेअर करण्याची विनंती करतो.” परंतु, एअर इंडियाने आता कोणताही संपर्क साधू नये, अशी विनंती कंवर यांनी केली आहे.