Air India Statement on Ahmedabad Flight Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. मेघानी नगर परिसरात घडलेल्या या घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. २४२ लोकांना घेऊन हे विमान लंडनला जात होतं, पण टेकऑफनंतर काही मिनिटांतच ते खाली कोसळलं. रहिवाशी भागात विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

विमान अपघाताबद्दल एअर इंडियाने निवेदन दिलं आहे. विमान कोसळल्याची पुष्टी एअर इंडियाने केली असून या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान AI171 आज टेक ऑफनंतर कोसळले, अशी पुष्टी एअर इंडियाने केली आहे.

अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघालेल्या या बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.

या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आम्ही 1800 5691 444 हा एक पॅसेंजर हॉटलाइन नंबर सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. एअर इंडिया त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर आणि वेबसाईटवर या घटनेशी संबंधित सर्व अपडेट्स व माहिती शेअर करेल.

नोट: एअर इंडियाकडून प्रवाशांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. संबंधितांनी 1800 5691 444 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन एअर इंडियाकडून करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा पोस्ट

Air India Statement on Ahmedabad Flight Crash
एअर इंडियाची पोस्ट (सौजन्य – स्क्रीनशॉट)

घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीच मिनिटात अवघ्या ७ किमी अंतरावर दूर जाऊन ते कोसळलं. या दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.