मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एअर इंडियाच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एका ग्राउंड हँडलिंग एजन्सीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक विमानांचे वेळापत्रक कोलमडले. या संपामुळे तब्बल १५ हून अधिक विमानांना दीड ते दोन तासांचा उशीर झाला.

विमानांचे उड्डाण रखडले, प्रवासी विमानांमध्येच अडकले

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृ्त्तानुसार, मुंबईहून बाहेर जाणाऱ्या १५ विमानांनी वेळेत उड्डाण केले नाही. केवळ उड्डाणेच नाही, तर मुंबईत येणाऱ्या विमानांनाही याचा मोठा फटका बसला. हैदराबादहून मुंबईला आलेले एअर इंडियाचे विमान सकाळी ११:४५ वाजता उतरले, परंतु ग्राउंड स्टाफ नसल्याने प्रवाशांना तब्बल पाऊण तास विमानाबाहेर पडता आले नाही.

पुण्याचे व्यावसायिक सुजित दिलीप (५०) यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले, “आमचे विमान ११:४५ ला लँड झाले, पण दुपारी १ वाजेपर्यंत आम्हाला आतच बसवून ठेवले. बाहेर आल्यावर समजले की संप सुरू आहे. एवढंच नाही तर सामान (बॅगेज) मिळायला दुपारचे २ वाजले. या गोंधळामुळे मुंबईतील माझी महत्त्वाची बिझनेस मीटिंग हुकली.”

mumbai-airport-air-india-flights-delayed-due-to-ground-staff-strike
मुंबई विमानतळावर अचानक झालेल्या संपामुळे विमानांचे उड्डाण रखडले, प्रवाशांचा खोळंबा.

प्रवाशांचा संताप; माहिती देण्यास कोणीच नाही

मुंबईहून डेहराडूनला जाणाऱ्या ‘AI 431’ या विमानाचे उड्डाण दुपारी १२:१० वाजता होणार होते, परंतु ते दोन तास उशिराने धावत होते. बोर्डिंग पासवर ११:१० ची वेळ असूनही दुपारी १ वाजेपर्यंत बोर्डिंग सुरू झाले नव्हते. विमानतळावर प्रवासी ताटकळत उभे होते, मात्र विमान कंपनीकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

एअर इंडियाचे स्पष्टीकरण

या संपूर्ण गोंधळानंतर एअर इंडियाने अधिकृत पत्रक जारी करून परिस्थिती स्पष्ट केली. कंपनीने म्हटले, “एका त्रयस्थ (थर्ड पार्टी) ग्राउंड हँडलिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद केल्यामुळे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान सेवेवर परिणाम झाला आहे. विमानतळ प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी मिळून आम्ही परिस्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करत आहोत. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

दरम्यान, हा संप नेमका कोणत्या कारणासाठी पुकारण्यात आला होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या अचानक झालेल्या आंदोलनामुळे शेकडो प्रवाशांचे हाल झाले आणि मुंबई विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.