Air India Ticket Rate Increased: मध्य पूर्वेतील संघर्षामुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असताना आता विमान प्रवास देखील महाग होणार आहे. एअर इंडियाने भाडेवाढ जाहीर केली आहे. विमानासाठी लागणाऱ्या इंधनात मोठी वाढ झाल्याने देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आता प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. एअर इंडिया तीन फेजमध्ये ही दरवाढ करणार आहे.
विमानासाठी लागणारे इंधन महाग
एअर इंडिया प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ च्या सुरुवातीपासूनच आखाती प्रदेशात इंधनाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे दरवाढ लागू करण्यात येत आहे. तीन फेजमध्ये नवी दरवाढ लागू करण्यात येईल, असेही एअर इंडियाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तीन फेजमध्ये दरवाढ
फेज एक: देशाअंतर्गत आणि सार्क देशात जाणाऱ्या विमानांसाठी येत्या १२ मार्चच्या बुकिंगपासून भाडेवाढ लागू असेल. सार्क देशांत अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यासाठी प्रवाशांना ३९९ अधिक पैसे मोजावे लागतील.
फेज दोन: तिसऱ्या फेजमध्ये काही आंतरराष्ट्रीय फ्लाईटवर दरवाढ करण्यात येईल. पश्चिम आशिया (१० डॉलर), दक्षिण पूर्व आशिया (२० डॉलर) आणि आफ्रिका (३० डॉलर) भाडेवाढ करण्यात येईल. १८ मार्चपासूनच्या बुकिंगवर ही भाडेवाढ लागू असणार आहे.

फेज तीन: यामध्ये हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशात जाणाऱ्या फ्लाईट्ससाठी दरवाढ करण्यात येईल, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. यासाठी तारीख पुढे जाहीर करण्यात येईल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
एव्हिएशन टर्बाइन इंधन
कंपनीच्या मते विमान कंपनीच्या ऑपरेटिंग खर्चात एव्हिएशन टर्बाइन इंधनाचा वाटा सुमारे ४० टक्के असतो, यामुळे इंधनाच्या किमतींमध्ये बदल केले जात असतात. अखाती देशात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा थेट परिणाम दरवाढीवर झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.
