येत्या १ जानेवारीपासून एअर इंडियाच्या कुठल्याही विमानात इकॉनॉमी वर्गातील प्रवाशांना ९० मिनिटांचा हवाई प्रवास असेल तर मांसाहारी अन्न दिले जाणार नाही असे सांगण्यात आले. एअर इंडिया ही राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असून त्यांनी दुपारच्या जेवणातून चहा व कॉफी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एअर इंडियात ९० मिनिटांच्या प्रवासात मांसाहारी व शाकाही अन्न तसेत केक दिला जात असे. आता जानेवारीपासून त्यात बदल करण्यात आले आहेत, सर्व अन्न शाकाहारी व गरम असेल असे पत्रकात म्हटले आहे.
सर्व देशांतर्गत विमानात ६१ ते ९० मिनिटांच्या प्रवासात शाकाहारी अन्न दिले जाईल व हा निर्णय १ जानेवारी २०१६ पासून अमलात येईल. महानगरे नसलेल्या अनेक शहरांची हवाई वाहतूक यात येते. एअर इंडियाने या निर्णयाचे समर्थन केले असून काहींच्या मते हा एकतर्फी निर्णय आहे. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही जेवणात सुधारणा करीत आहोत. यापूर्वी केवळ केक व सँडविचेस दिली जात होती आता गरम जेवण देणार आहोत.
वाहतूक व्यवसाय तज्ज्ञ रज्जी राय यांच्या मते हा निर्णय घेण्याअगोदर प्रवाशांची मते अजमावण्याची गरज होती. असा कुठलाही बदल करताना प्रवाशांची मते घ्यायची असतात त्यामुळे मांसाहारी अन्न बंद करण्याचा निर्णय एकतर्फी आहे. एअर इंडियाचा गेल्या महिन्यात प्रवासी सेवेचा वाटा १६.२ टक्के आहे.
कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सेवा देणे अशक्य
विमानात १५० प्रवासी व दोन कर्मचारी असतात. हे प्रमाण बघता प्रवाशांना कमी काळात त्यांच्या पसंतीचे वेगवेगळे पदार्थ देता येणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण एअर इंडियातर्फे देण्यात आले.