गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून यापुढे विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना जबर दंड ठोठावला जाऊ शकतो. एअर इंडियाच्या प्रशासनाकडून या प्रस्तावावर विचार सुरू असून, हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास गोंधळी प्रवाशांना १५ लाखांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यामुळे आता एअर इंडिया भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. या प्रस्तावानुसार प्रवाशांच्या कोणत्याही कृत्यामुळे विमान सुटायला तासभर उशीर झाल्यास कमीतकमी ५ लाख रूपये, दोन तास उशीर झाल्यास १० लाख आणि त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास १५ लाख रूपये इतका दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती ‘पीटीआय’ने दिली.

गेल्या महिन्यात रवींद्र गायकवाड यांनी बिझनेस श्रेणीचे तिकीट असूनही इकॉनॉमी श्रेणीत बसविण्यात आल्यावरून वाद घालत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. देशभरात या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर एअर इंडिया आणि सहा खासगी विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्यावर हवाईबंदी घातली होती. त्यामुळे राजकीय नेते आणि विमान कंपन्यांमध्ये संघर्ष पेटला होता. या संघर्षाचे पडसाद थेट संसदेपर्यंत उमटले होते. अखेर केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतल्याने हा वाद मिटला होता. मात्र, या एकुणच प्रकरणात विमान कंपन्यांनी नेहमीपेक्षा कठोर पवित्रा घेतल्याचे दिसून आले होते.