Air India Tokyo-Delhi Flight Diverted To Kolkata : एअर इंडिया कंपनीचं दिल्लीला जाणारं एक विमान अचानक कोलकाता विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आलं आहे. टोक्योवरून उड्डाण केलेलं हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होतं. मात्र, कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आलं. या विमानाच्या केबिनमधील तापमान सातत्याने वाढत होतं. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पायलटने विमान तातडीने कोलकात्याच्या दिशेने वळवलं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरवण्यात आलं.
याबाबत माहिती देताना एअर इंडियाने म्हटलं आहे की विमान सुरक्षितपणे कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आलं आहे. आम्ही आमच्या प्रवाशांना तातडीने दिल्लीला घेऊन जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहोत.
विमान अचानक उतरवण्याचं कारण काय?
एअर इंडियाने याबाबत एक प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की “२९ जून रोजी हनेडावरून (टोक्यो) दिल्लीसाठी उड्डाण करणारं एअर इंडियाचं विमान एआय-३५७ च्या केबिनमध्ये सातत्याने तापमान वाढत होतं. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे विमान तातडीने उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोलकाता विमानतळ सर्वात जवळ असल्याने हे विमान कोलकात्याच्या दिशेने वळवण्यात आलं. पायलटने हे विमान नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरवलं. आम्ही विमानाची तपासणी करत आहोत. या अनपेक्षित लॅन्डिंगमुळे प्रवाशांची गैरसोय झाली असल्यामुळे कोलकात्यामध्ये आमची ग्राउंड टीम प्रवाशांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत पुरवत आहे.
मुंबई-चेन्नई फ्लाइट माघारी वळवण्यात आली
गेल्या काही दिवसांपासून एअर इंडिया कंपनी सातत्याने अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड देत आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेच्या धक्क्यातून कंपनी अद्याप सावरलेली नाही तोच इराण-इस्रायल युद्धामुळे अनेकदा विमान वळवणे, तांत्रिक अडचणींमुळे विमान वळवणे, उड्डाण रद्द करण्यासारख्या आव्हानांचा सामना करत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून चेन्नईला जाणारं विमान अर्ध्या वाटेतून माघारी परतलं होतं.
२७ जून रोजी एअर इंडियाचं विमान एआय-६३९ च्या केबिनमध्ये काहीतरी जळत असल्याचा वास येऊ लागला. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव विमान परत लॅन्ड करण्यात आलं. मुंबईवरून चेन्नईला जाणारं हे विमान उड्डाणानंतर माघारी वळवण्यात आलं. विमानाची तपासणी करून, आवश्यक दुरुस्ती करून विमानाने उड्डाण केलं.