पाकिस्तानातील बालकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला. या एअर स्ट्राइकसाठी वापरण्यात आलेल्या प्रत्येक वॉरहेडमध्ये ७० ते ८० किलो टीएनटी स्फोटके होती. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

एकूणच या मोहिमेसाठी किती प्रमाणात स्फोटके वापरण्यात आली. त्यावरुन बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत. एअर फोर्सने हवाई हल्ल्यासाठी इस्त्रायली बनावटीच्या प्रीसीशन गाइडेड म्युनिशनचा वापर केला. मिराज-२००० विमानातून जैशच्या तळावर एकूण १ हजार किलोचे बॉम्ब फेकले असे अनेक बातम्यांमध्ये म्हटले आहे. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी क्षमतेची स्फोटके वापरल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक वॉरहेडमध्ये ७० ते ८० किलो टीएनटी स्फोटके होती असे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

किती प्रमाणात स्फोटके वापरली ते महत्वाचे नसते. वॉरहेडची डिझाईन, स्फोटकांचा प्रकार, स्फोटकांमध्ये मिसळलेले साहित्य, कशा पद्धतीने कुठल्या दिशेने स्फोटके टार्गेटचा वेध घेतात. कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्याआधी या सर्व गोष्टींचा आढावा घेणे महत्वाचे असते असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बालकोटमध्ये हल्ल्यासाठी स्पाइस २००० अस्त्र वापरण्याच्या वृत्ताला हवाई दलाने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

स्पाइस २००० मध्ये काही खास वैशिष्टये आहेत. त्यामुळे दिवसा, रात्री आणि खराब वातावरणातही लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता त्यामध्ये आहे. जैश-ए-मोहम्मदचा तळावर हल्ला करण्यासाठी आम्ही जे अस्त्र वापरले ते गोपनीय आहे. पण लक्ष्यावर अचूक प्रहार करण्यासाठी त्याचा वापर होतो. आसपासचे कुठलेही नुकसान न करता फक्त लक्ष्याचा वेध घेतला जातो. आणि आम्ही जे अस्त्र वापरले त्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला आहे असे दुसऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. यावेळी लक्ष्य बालकोट होते. त्याऐवजी मुझफ्फराबाद टार्गेट असते जिथे मोठया प्रमाणावर लोकवस्ती आहे. त्याठिकाणी सुद्धा अचूक लक्ष्यावर प्रहार करण्याची आमची क्षमता आहे असे अधिकाऱ्याने सांगितले.