पीटीआय, नवी दिल्ली

इंधन खर्चात झालेली वाढ, मर्यादित क्षमता आणि कमी नफा या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील युद्धामुळे हवाई प्रवासाचे भाडे आधीच वाढू लागले असल्याचे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयएटीए) मंगळवारी सांगितले.

‘आयएटीए’मध्ये सुमारे ३५० विमान कंपन्यांचा समावेश असून त्यात एअर इंडिया, इंडिया एक्स्प्रेस, इंडिगो आणि स्पाइसजेट यांचा समावेश आहे. आयएटीएने फेब्रुवारी २०२६ मधील जागतिक प्रवासी मागणीचा अहवाल जाहीर केला. त्यानुसार, ‘रेव्हेन्यू पॅसेंजर किलोमीटर’ (आरपीके) या निकषानुसार मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.१ टक्क्यांनी वाढ झाली. ‘अव्हेलेबल सीट किलोमीटर’ (एएसके) या क्षमतेत ५.६ टक्के वाढ झाली असून प्रवासी लोड फॅक्टर ८१.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा फेब्रुवारीतील आतापर्यंतचा उच्चांक आहे.

युद्ध किती काळ चालेल आणि त्याची तीव्रता किती असेल, याचा अंदाज नसल्याने विमान उद्योगावर त्याचा नेमका किती परिणाम होईल, हे सांगणे अशक्य असल्याचे ‘आयएटीए’चे महासंचालक विल्यम वॉल्श यांनी म्हटले आहे.