Indian Air Force woman officer promotion : भारतीय हवाई दलाच्या एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा यांनी इतिहास रचला आहे. वैद्यकीय शाखेव्यतिरिक्त भारतीय संरक्षण दलातील एअर व्हाइस मार्शल पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. शर्मा यांनी मंगळवारी हवाई दल मुख्यालयात सहाय्यक हवाई दल प्रमुख (शिक्षण) म्हणून पदभार स्वीकारला. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती देताना त्यांच्या नियुक्तीला संरक्षण दलातील महिला अधिकाऱ्यांच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
१९९४ मध्ये हवाई दलात दाखल
शक्ती शर्मा यांची १८ जून १९९४ रोजी भारतीय हवाई दलाच्या शिक्षण शाखेत नियुक्ती झाली. तीन दशकांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी प्रशिक्षण संस्था, विविध तळ, कमांड मुख्यालय आणि हवाई दल मुख्यालयात काम केले आहे. त्यांनी शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. आयआयटी कानपूर आणि पुणे विद्यापीठात हवाई दलाच्या ‘आयएएफ चेअर्स ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यातही त्यांची भूमिका होती.
सैनिक शाळेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
शक्ती शर्मा या तिन्ही संरक्षण दलांमधून सैनिक शाळेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी देखील आहेत. त्यांनी कपूरथला येथील सैनिक शाळेच्या प्राचार्य म्हणून काम केले आहे.
२०१० नंतर वाढल्या संधी
महिला अधिकाऱ्यांना २०१० मध्ये हवाई दलाने कायमस्वरूपी नियुक्तीचा पर्याय दिल्यानंतर त्यांच्या पदोन्नती आणि कारकीर्दीच्या संधी वाढल्या. विविध करिअरविषयक अभ्यासक्रमांमध्येही त्यांचा सहभाग वाढला. लष्कर आणि नौदलाने निवडक शाखा आणि सेवांमध्ये महिलांना २००८ पासून कायमस्वरूपी नियुक्ती देण्यास सुरुवात केली. २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही संधी अनेक शाखांपर्यंत विस्तारली.
याआधीही महिलांनी रचले विक्रम
हवाई दलातील महिला अधिकाऱ्यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. २०२३ मध्ये ग्रुप कॅप्टन शालिजा धामी यांनी पश्चिम क्षेत्रातील क्षेपणास्त्र पथकाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला. गेल्या महिन्यात स्क्वाड्रन लीडर भावना कंठ यांनी ग्वाल्हेरमधील लढाऊ विमान प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या.मे महिन्यात स्क्वाड्रन लीडर सान्या यांनी ‘कॅटेगरी-ए पात्र उड्डाण प्रशिक्षक’ ही पात्रता मिळवणाऱ्या हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला.
