* तिकीट दरांवरून हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये स्पर्धा
हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये तिकीट दरांवरून सध्या मोठी स्पर्धा सुरू आहे. ‘स्पाईसजेट’ कंपनीने बुधवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने करांसहित १,५९९ रुपयांमध्ये तिकीट जाहीर केल्यानंतर इंडिगो कंपनीनेही त्यापुढे जाऊन १,४९९ रुपयांत हवाई सफर घडवून आणण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
‘इंडिगो’च्या या योजनेतील सवलतीच्या तिकिटासाठी ९० दिवस अगोदर तिकिट नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच ही सवलत दिल्ली-जयपूर अशा काही निर्धारित मार्गांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुधवारी स्पाईसजेटने सर्व उड्डाणांसाठी किमान तिकिट दर हे १५९९ रुपये केले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पाईसजेट कंपनीने पाच लाख प्रवाशांसाठी ‘सुपर सेल’ योजना २८ जानेवारी रोजी सुरू केली. याला ग्राहकांना उदंड प्रतिसाद मिळाला असून कंपनीची तिकीट विक्री तब्बल चारशे टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आता इंडिगो कंपनीनेही ‘स्पाईसजेट’पेक्षा १०० रु. कमी दर आकारून स्पर्धेत उडी घेतली आहे.



