जिओला टक्कर देणाऱ्या एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना होळीच्या दिवशी सरप्राईज गिफ्ट देणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना ‘सरप्राईज’ दिले आहे. एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना ३० जीबी ४जी डेटा सरप्राईज गिफ्ट म्हणून दिला आहे. हा डेटा दर महिन्याला १० जीबी या प्रमाणात ३ महिन्यांसाठी उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ आणि त्यांच्या प्राईम ऑफर्सला टक्कर देण्यासाठी एअरटेलने ग्राहकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे.

माय एअरटेल अॅपच्या माध्यमातून पोस्टपेड ग्राहकांना हा डेटा मोफत देण्यात आला आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना सरप्राईज ऑफरचा लाभ घेता येईल. यामुळे ग्राहकांना दर महिन्याला १० जीबी डेटा ४च्या वेगाने वापरता येणार आहे. एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून या ऑफरची माहिती दिली आहे.

एअरटेलने ३० जीबी डेटाची सरप्राईज ऑफर आणण्यापूर्वी पोस्टपेड ग्राहकांसाठी काही विशेष ऑफर आणल्या होत्या. रिलायन्स जिओच्या प्राईम ऑफर समोर ठेऊनच या ऑफरची रचना करण्यात आली होती. या नव्या ऑफरनुसार एअरटेलकडून ग्राहकांना दर दिवसाला १ जीबी ४जी डेटा दिला जाणार आहे. ३०३ रुपयांमध्ये ही ऑफर एअरटेलने काही दिवसांपूर्वी बाजारात आणली. रिलायन्स जिओकडूनदेखील अशीच ऑफर देण्यात आली होती. मात्र यासाठी प्राईम मेंबरशीप आवश्यक असल्याचे रिलायन्स जिओने सांगितले आहे. प्राईम मेंबरशीपसाठी रिलायन्स जिओच्या ग्राहकांना एका वर्षासाठी ९९ रुपये भरावे लागतील.

प्राईम मेंबरशीप स्वीकारण्यासाठी रिलायन्स जिओने ३१ मार्च ही शेवटची तारीख दिली आहे. यानंतर रिलायन्स जिओकडून प्राईम मेंबरशीप दिली जाणार नाही. रिलायन्स जिओची सेवा स्वस्त असल्याने ग्राहकांनी प्राईम मेंबरशीपकडे आकर्षित होऊ नये, यासाठी सध्या एअरटेलकडून प्रचंड मेहनत घेतली जाते आहे. एअरटेलच्या ग्राहकांनी प्राईम मेंबरशीप स्वीकारु नये, यासाठी एअरटेलने पुढील ३ महिन्यांसाठी प्रत्येकी १० जीबी ४जी डेटाचे सरप्राईज ग्राहकांना दिले आहे.