रिलायन्सने जिओची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवल्यानंतर एअरटेलने एका वर्षभरासाठी ४ जी डाटा संपूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या योजनेनुसार ४ जी वापरणाऱ्या ग्राहकांना वर्षभरासाठी ९,००० रुपये किंमत असलेला डाटा मोफत मिळणार आहे. उद्यापासून या ऑफरला प्रारंभ होणार असून २८ फेब्रुवारीपर्यंत नवे कनेक्शन घेणाऱ्यांना या ऑफरचा लाभ घेता येईल असे कंपनीने सांगितले. प्रीपेड ग्राहकांना ३४५ रुपयांच्या रिचार्जवर ३ जीबी डाटा मोफत मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले. दर महिन्याला ३ जीबी डाटा मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले.

याआधी, नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या ग्राहकांना भेट म्हणून केवळ १४४ रुपयांमध्ये अमर्यादित फोन कॉल्स आणि ३०० एमबी डाटा मोफत मिळणार आहे, अशी घोषणा बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी केली. ही योजना प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी आहे. रिलायन्स जिओच्या घोषणेनंतर अनेक कंपन्यांनी आपली सेवा स्वस्त केली आहे. व्होडाफोन, आइडिया सेल्युलर या कंपन्यांनी आपली सेवा स्वस्त केली आहे. तसेच ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. रिलायन्सने आपली अमर्यादित मोफत कॉल्सची योजना ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे.