scorecardresearch

माऊंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय बाप-लेक

कुटुंबामध्ये मुलांबरोबर मुलींनाही पाठिंबा देण्याची गरज आहे. तसे झाले तर भारतीय मुली देशाला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवतील.

माऊंट एव्हरेस्ट सर करणे हे जगभरातील गिर्यारोहकांसाठी एक स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. यामध्ये अपंगांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत विविध स्तरातील लोकांचा समावेश असतो. भारतातीलही अनेक जणांनी माऊंट एव्हरेस्ट सर करत आपल्या नावावर विक्रमांची नोंद करुन घेतली आहे. त्यात आता आणखी एक भर पडली असून वडील आणि मुलगी अशा जोडीने जगातील हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा मान पटकावला आहे. पद्मश्री अजित बजाज आणि त्यांची मुलगी दिया सुझान बजाज या बाप-लेकीने नुकतीच ही मोहीम एकत्रितपणे पूर्ण केली आहे. अजित बजाज हे स्नो लिओपार्ड अॅडव्हेंचर्सचे संस्थापक असून मागील अनेक वर्षांपासून ते गिर्यारोहण करतात.

आपल्या या अनुभवाबाबत अजित बजाज म्हणतात, माऊंट एव्हरेस्ट सर करणे ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. मात्र त्याहूनही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे, ‘मुली कमी नसून त्या शक्तीशाली आहेत’ हा या मोहिमेतून द्यायचा असलेला संदेश. ते पुढे सांगतात, मी आणि दिया मागील अनेक वर्षांपासून एकत्र वेगवेगळ्या मोहिमा करत आहोत. ती १४ वर्षांची असताना आम्ही पहिल्यांना एकत्र कयाकिंग केले. १० वर्ष एकत्र फिरल्यानंतर आता एकत्रितपणे एव्हरेस्ट सर करायला हवा या विचाराने आम्ही या मोहिमेचे नियोजन केले. यासाठी आम्ही जोरदार शारीरिक तयारीही केली. आम्ही रोज तीन तास कार्डिओ व्यायाम करायचो. तसेच सराव म्हणून आम्ही लडाख, नेपाळ आणि फ्रान्समध्ये मोहिमा केल्या. यामुळे आम्हाला कळाले की तांत्रिकदृष्ट्याही आम्ही कमजोर आहोत. मग आम्ही त्यावरही काम केले.

ते म्हणाले, मुलीसोबत एव्हरेस्टची मोहिम करत असल्याने काही प्रमाणात काळजीही होती. वाऱ्याचा वेग इतका असायचा की संपूर्ण रात्रभर टेंट जोरजोरात हलत राहायचे. अशावेळी टेंट फाटेल किंवा उडून जाईल असे वाटायचे. हवामान सतत बदलत असल्याने पुढे जाण्याबाबत संभ्रम असायचा मात्र ही मोहीम पूर्ण करायची असे आम्ही दोघांनी मनोमन ठरवले असल्याने आम्ही पुढे जात राहीलो. दिया कायमच आमच्या मोहिमेचे वातावरण हलके ठेवण्याचा प्रयत्न करायची तसेच ती टीममधील प्रत्येकाची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायची असेही त्यांनी नोंदवले. आपल्या देशात मुलींना महत्त्व दिले जात नाही. मात्र या मोहिमेनंतर मी जास्त ठामपणे हे सांगू इच्छितो, मुली जे ठरवतात ते करुन दाखवतात.

तर दिया म्हणाली, वडिलांबरोबर अशाप्रकारे माऊंट एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकावणे ही आम्हा दोघांसाठी खूप आनंदाची गोष्ट होती. बाबांकडून मी कायमच गिर्यारोहणाबाबतच्या अनेक गोष्टी शिकते. मात्र ते मला कधीच उपदेश न करता उदाहरणांवरुन गोष्टी पटवून देतात. तर तु तुझ्या वडिलांसारखी आहेस ही माझ्यासाठी मोहिमेदरम्यानची सर्वात मोठी प्रशंसा होती. मात्र कुटुंबामध्ये मुलांबरोबर मुलींनाही पाठिंबा देण्याची गरज आहे. तसे झाले तर भारतीय मुली देशाला विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवतील.

 

रिमा लोकेश,

संपादिका, एक्सप्रेस ट्रॅव्हल वर्ल्ड

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajeet bajaj and divya bajaj are first indian pair of father and daughter who climb mount everest

ताज्या बातम्या