Ajit Doval US Court Summon : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दिवाणी खटला दाखल केल्यानंतर अमेरिकेतील एका न्यायालयाने या प्रकरणी भारत सरकारला समन्स बजावलं आहे. न्यूयॉर्कमधील जिल्हा न्यायालयाने जारी केलेल्या समन्समध्ये भारत सरकार, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आर अँड एडब्ल्यूचे (रॉ) माजी अध्यक्ष सामंत गोयल, रॉचे एजंट विक्रम यादव आणि अमेरिकास्थित भारतीय व्यापारी निखिल गुप्ता यांची नावं आहेत. न्यायालयाने २१ दिवसांमध्ये या समन्सला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की “ही चिंतेची बाब आहे. आम्ही याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे”. परराष्ट्र मंत्रालयाची बाजू मांडताना अरिंदम बागची म्हणाले, “एका भारतीय व्यक्तीविरोधात अमेरिकेतील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. एक हत्येच्या कटाचं प्रकरण भारतीय अधिकाऱ्याशी जोडलं गेलं आहे, हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. हे आमच्या सरकारी धोरणाविरोधात आहे. त्यामुळे आम्ही याप्रकरणी चौकशी करत आहोत”.

हे ही वाचा >> Lebanon Walkie Talkies Blasts : लेबनानमधील स्फोटानंतर वॉकीटॉकी बनवणाऱ्या जपानी कंपनीकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “आम्ही २०१४ नंतर…”

भारताचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले?

यावर्षी, मे महिन्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की “भारत या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे”. दरम्यान, या प्रकरणाचा भारत व अमेरिकेच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही असं जयशंकर यांनी म्हटलं होतं. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “अमेरिकेने चांगल्या भावनेने काही माहिती आमच्या निदर्शनास आणून दिली आहे. कारण तिथे घडलेल्या काही घटना या आमच्या संबंधांवर परिणाम करू शकतात. आम्ही त्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहोत. या प्रकरणात भारताचा कसलाही सहभाग नाही. त्यामुळे, या प्रकरणाचा उभय देशांच्या संबंधांवर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही”.

हे ही वाचा >>Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या

अमेरिकेचे भारतातील राजदून एरिक गार्सेटी यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, “आम्हालाही असं वाटत नाही की या प्रकरणाचा भारत व अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होईल”. गुरपतवंतसिंग पन्नू हा भारत, भारतीय नेते व भारतीय संस्थांविरोधात भडकाऊ भाषणं द्यायचा. तो भारताला नेहमी धमक्या द्यायचा. केंद्र सरकारने २०२० मध्ये त्याला दहशतवादी घोषित केलं होतं.