Ajit Doval Meets Putin Carrying Ukraine Peace Plan to Russia : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काही वेळापूर्वी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग येथे अजित डोवाल यांच्याशी दोन्ही देशांचे परस्पर संबंध, रशिया-युक्रेन युद्ध व सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीवेळी पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिक्स शिखर परिषदेचं निमंत्रण दिलं. तसेच पुतिन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की ब्रिक्स परिषदेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चेचं आयोजन करावं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिन्याभरापूर्वी रशियाचा दौरा केला होता. मोदी यांनी त्यावेळी पुतिन यांच्याशी रशिया-युक्रेन युद्धासह जागतिक, प्रादेशिक व द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली होती. रशियाची शासकीय वृत्तसंत्था तासने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भारतीय पंतप्रधानांबरोबर द्विपक्षीय बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मोदी यांनी मॉस्को दौऱ्यावेळी जे करार केले होते, त्यांच्या अंमलबजावणीवर आगामी द्विपक्षीय बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.

तासने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन अजित डोवाल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीवेळी म्हणाले, “आम्ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कझानमध्ये वाट पाहत आहोत. मला असं वाटतं की २२ ऑक्टोबर रोजी आम्ही द्विपक्षीय बैठकीत चर्चा करावी”. दरम्यान, अजित डोवाल यांनी पुतिन यांना भेटल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युक्रेन दौऱ्याची माहिती दिली. तसेच रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारत व मोदींच्या भूमिकेची माहिती दिली.

हे ही वाचा >> PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम

रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी भारतही प्रयत्नशील

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी मोदींनी केलेल्या चर्चेची देखील डोवाल यांनी पुतिन यांना माहिती दिली. मोदी म्हणाले होते की “रशिया व युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चा करायला हवी, मार्ग काढायला हवा. उभय देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी भारत सक्रीय भूमिका निभावण्यास तयार आहे”. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने एनडीटीव्हीने म्हटलं आहे की रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी भारत जी पावलं उचलतोय त्याची माहिती देण्यासाठी अजित डोवाल पुतिन यांना भेटले आहेत. ते मोदींची शांतता योजना घेऊन रशियाला गेले होते.