भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादाविरुद्धच्या लढ्याबाबत ठाम भूमिका मांडत अनेकदा पाकिस्तानला खडेबोल सुनावलेले आहेत. आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देखील पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्यांवरून पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. सध्या अजित डोवाल हे रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मॉस्को येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित डोवाल यांनी दहशतवादाबाबत बोलताना भारताची ठाम भूमिका मांडत ‘दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात दुटप्पीपणा चालणार नाही’, अशा शब्दांत पाकिस्तानला अप्रत्यक्ष सुनावलं आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये सुरक्षाविषयक बाबींसाठी जबाबदार असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची १४ वी आंतरराष्ट्रीय बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना अजित डोवाल यांनी म्हटलं की, “दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे. त्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात कोणताही देश दुटप्पीपणा करू शकत नाही, तसेच जबाबदार राष्ट्रांनी दहशतवादी गट आणि अशा गटांना पुरस्कृत करणाऱ्या किंवा वित्तपुरवठा करणाऱ्या देशांविरुद्ध निर्णायक कारवाई केली पाहिजे”, असं मत अजित डोवाल यांनी मांडलं. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

“दहशतवादाविरुद्ध लढणं ही प्रत्येक देशाची जबाबदारी आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात कोणतीही दुटप्पीपणाची भूमिका चालणार नाही. जबाबदार राष्ट्रांनी आपल्या पर्यायांचं मूल्यांकन करून ठरवलं पाहिजे की ते दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांना पाठिंबा देतात की त्यांचा प्रतिकार करून दहशतवादी गटांविरुद्ध निर्णायक कारवाई करतात”, असंही अजित डोवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत अजित डोवाल म्हणाले की, “भारत देश हा पुरस्कृत दहशतवादाचा बळी ठरला आहे. त्याचा संदर्भ हा पाकिस्तानात असलेल्या इस्लामाबाद समर्थित दहशतवादी गटांशी आहे. पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांची त्यांच्या कुटुंबीयांसमोर झालेली हत्या ही जगाने पाहिली आहे. पीडितांना त्यांचा धर्म विचारून ठार मारण्यात आलं. मात्र, त्यानंतर भारताने दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर निर्णायक कारवाई केली”, असंही अजित डोवाल यांनी म्हटलं.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही भारताने पाकिस्तानला सुनावलं

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत देखील भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. “दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकला परिणाम भोगावे लागतील”, अशा स्पष्ट शब्दात संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत हरीश परवथनेनी ठणकावून सांगितलं आहे. पाकिस्तान अनेक दशकांपासून दहशतवाद, धार्मिक कट्टरतावादाला प्रोत्साहन देत असल्याचं भारताने वारंवार नमूद केल्याचंही परवथनेनी यांनी स्पष्ट केलं आहे. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत हरीश परवथनेनी यांनी भारताची भूमिका मांडली.