Ajit Doval Spy Story China Thrilling Revelations: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेतील कारकिर्दीची एक थरारक आठवण नुकतीच सांगितली आहे. विशीत असताना ते गुप्तहेर म्हणून रुजू झाले होते. त्या काळात भारत-चीन सीमेलगत राबवलेली एक अत्यंत गुप्त मोहीम फसली आणि डोभाल यांना आपली कारकीर्द संपुष्टात आल्याची भीती वाटू लागली होती. मात्र संकटाच्या त्या क्षणाने त्यांना आयुष्यभरासाठी एक मोलाचा धडा दिला. सहसा आपल्या अनुभवांबद्दल फारसे न बोलणारे अजित डोभाल यांनी शनिवारी ‘आयआयटी रुरकी’च्या दीक्षांत समारंभात या थरारक मोहिमेचा किस्सा जाहीरपणे सांगितला.

एएनआय वृत्तसंस्थेने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.

त्या काळातील आठवण सांगताना डोभाल म्हणाले, “मी सिक्कीममध्ये गुप्तचर विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत होतो. तो काळ सिक्कीम भारताचा भाग होण्याच्या प्रक्रियेचा होता. मी त्या संपूर्ण विलीनीकरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष साक्षीदार होतो.”

१९७५ मध्ये सिक्कीमचे भारतात औपचारिक विलीनीकरण होण्यापूर्वी, नामग्याल घराण्यातील चोग्याल राजे तेथे राज्य करत होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५० च्या करारानुसार सिक्कीम भारताचे संरक्षित राज्य होते. ज्या काळात ‘रॉ’च्या गुप्त मोहिमांमार्फत सिक्कीमच्या विलीनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होती, त्याच सुमारास डोभाल यांच्याकडे सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

आठ दिवसांची मोहीम अन् १५ दिवस संपर्क तुटला

याच दरम्यान सीमेपलीकडील माहिती गोळा करण्यासाठी डोभाल यांनी आपल्या सहकाऱ्यांचे एक पथक पाठवले होते. हे पथक आठ दिवसांत परतणे अपेक्षित होते. मात्र, पंधरा दिवस उलटून गेले तरी त्यांच्याकडून कोणताही संपर्क झाला नाही. “व्यावसायिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर एक माणूस म्हणूनही माझ्यासाठी तो अत्यंत चिंतेचा क्षण होता. ते जिवंत आहेत की मारले गेले, त्यांच्याबरोबर नेमके काय घडले, याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्या भागात हिमस्खलन झाल्याचीही कोणती बातमी नव्हती,” असे डोभाल यांनी सांगितले.

काही दिवसांनंतर मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला. “माझ्या वरिष्ठांनी थेट विचारले, ‘तुम्ही लोकांना सीमेपलीकडे पाठवले होते का?’ मी म्हटले, ‘मला कल्पना नाही, ते येतच असतील.’ मात्र, चिनी सैन्याने त्या संपूर्ण पथकाला पकडले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजताच माझ्या पायाखालची जमीन सरकली,” अशी आठवण त्यांनी सांगितली.

काही दिवसांनंतर या भारतीय पथकाची सुटका झाली. “कदाचित दोन्ही बाजूंमध्ये काही देवाणघेवाण किंवा तोडगा निघाला असावा. पण जेव्हा ते परतले, तेव्हा ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते,” असे डोभाल म्हणाले.

‘माझी कारकीर्द संपल्यातच जमा होती’

तरुण वयात घडलेल्या या घटनेमुळे डोभाल प्रचंड तणावाखाली आले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. “मला वाटले की माझी कारकीर्द आता संपली. मला आता दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात नव्याने सुरुवात करावी लागेल. व्यावसायिक पातळीवर ही अक्षम्य चूक वाटत होती,” असे डोभाल यांनी स्पष्ट केले.

मात्र, चौकशीत त्यांना निर्दोष ठरवण्यात आले. मुख्यालयाकडून पथकाला पुरवण्यात आलेले नकाशे आणि आराखडे यातच त्रुटी असल्याचे तपासात उघड झाले. “माझी कोणतीही चूक आढळली नाही, माझ्या स्तरावर मी सर्व गोष्टी योग्य पद्धतीने केल्या होत्या. पण तरीही या घटनेने मला आतून हादरवून सोडले होते. आयुष्यात पूर्णपणे खचून जावे, असा तो अत्यंत कठीण काळ होता,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

तिबेटी शेर्पाचा सल्ला ठरला मार्गदर्शक

या नैराश्याच्या काळात गुप्तचर विभागात त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या एका तिबेटी शेर्पाने दिलेला सल्ला त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरला. डोभाल म्हणाले, “तो शेर्पा मला म्हणाला, ‘ये सब मॅप-रीडिंग का चक्कर है’. काही लोक नकाशा योग्य वाचतात, तर काहींचे वाचन चुकते. त्याने मला आयुष्याची तीन महत्त्वाची सूत्रे सांगितली. पहिले, सर्वप्रथम तुम्ही सध्या कुठे आहात, हे ओळखा. दुसरे, तुम्हाला नेमके कुठे पोहोचायचे आहे, हे ठरवा आणि तिथे पोहोचण्याचा योग्य मार्ग कोणता, हे निश्चित करा.

हा सल्ला डोभाल यांच्यासाठी केवळ त्या मोहिमेपुरता मर्यादित न राहता आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन बनला. त्यानंतरच्या काळात अजित डोभाल यांनी देशातील सर्वांत कर्तृत्ववान गुप्तहेर म्हणून नावलौकिक मिळवला. २०१४ पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करताना २०१६ चे सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि २०२५ चे ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या देशाच्या सुरक्षेशी निगडित ऐतिहासिक मोहिमांचे नेतृत्व त्यांनी केले आहे.