Ajit Doval on Operation Sindoor and PM Modi Reaction: काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल २०२५ रोजी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला. बैसरनच्या हिरवळीवर कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या निष्पाप नागरिकांवर धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये २६ निरपराध नागरिक मारले गेले. या हल्ल्याची माहिती पंतप्रधान मोदींना जेव्हा पहिल्यांदा कळली, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? याची माहिती आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिली आहे.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या ऑपरेशनमधून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे मोडण्यात आले. पाकिस्तानच्या भूमीत जाऊन भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या ऑपरेशन सिंदूरवर डिस्कव्हरी वृत्तवाहिनीकडून माहितीपट तयार केला जात आहे. या माहितीपटात अजित डोवाल यांनी मुलाखत दिली असून यात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या पहिल्या प्रतिक्रियेची माहिती दिली.
अजित डोवाल यांच्यासह या माहितीपटात प्रमुख नेते, ऑपरेशन सिंदूरशी निगडित लष्कर आणि सुरक्षा दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत.
या माहितीपटाचा काही भाग सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यात अजित डोवाल म्हणाले की, पंतप्रधान मोदींना हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडला आणि ते भारतात परतले. त्यांनी सर्वात आधी हल्ला कसा झाला, कुणी केला? याची माहिती मागितली.
पंतप्रधान मोदी भारतात परत येताच परराष्ट्र सचिव विमानतळावर भेटले. आम्ही विमानतळावरच यासंबंधीची बैठक घेतली. पंतप्रधानांनी सुरुवातीला सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांचा पहिला प्रश्न मला होता. ते म्हणाले, “हे कुणी केले? यासाठी जबाबदार कोण?” अजित डोवाल पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी त्याच बैठकीत स्पष्ट केले की, भारत या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना शोधून त्यांच्यावर कारवाई करेल.
आणखी एका व्हिडीओत अजित डोवाल यांनी म्हटले की, आम्ही हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शोधून त्यांच्यावर जोरदार कारवाई केली. “ते कुठेही लपलेले असोत. आकाश, पातळ, जमिनीवर कुठेही असले तरी आम्ही त्यांना शोधून काढू आणि सोडणार नाही”, असे विधान अजित डोवाल करताना दिसून आले.
ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या वाक्याचा अर्थही अजित डोवाल यांनी सविस्तर सांगितला. ते म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे सांगतात. तेव्हा याचा अर्थ असा की, जोपर्यंत शेवटचा दहशतवादी मारला जात नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.”
ऑपरेशन सिंदूरनंतर देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. यातून त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला होता. त्यांनी सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानला जाणारे पाणी अडवले.
डिस्कव्हरी वाहिनीच्या माहितीपटात अजित डोवाल यांच्यासह लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने कशापद्धतीने प्रत्युत्तर दिले, याची माहिती दिली.
