Ajit Pawar Death in Plane Crash : बारामती विमानतळावर कोसळलेल्या लिअरजेट ४५ या विमानाच्या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानाबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. हे विमान यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा नेत्यांच्या प्रवासासाठी वापरण्यात आले होते. पाटणा विमानतळावरील सूत्रांनी इंडिया टुडेला याबद्दलची महिती दिली आहे.

हे विमान व्हीएसआर व्हेंचर्सकडून ऑपरेट केले जाते. या विमानाने अनेक भाजपा नेते पाटणा येथे निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांना गेले होते. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांचा समावेश होता, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

पाटणा विमानतळावरील सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या दिवशीही या विमानाचे शेड्यूल व्यस्त होते. बुधवारी सकाळी १०:३० वाजता हे विमान आंध्र प्रदेशातील उद्योजक महेश कुमार रेड्डी यांना घेऊन शमशाबाद विमानतळावरून पाटणा येथे जाणार होते आणि त्यानंतर रात्री ९:३० वाजता तेथून पुन्हा उड्डाण करणार होते.

बारामती येथील विमान दुर्घटनेनंतर रेड्डी हे दुसर्‍या एका चार्टर्ड विमानाने पाटणा येथे गेले आणि रात्री साडेसातच्या सुमारास तेथून बाहेर पडले असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

अजित पवार (६६) हे प्रवास करत असलेले लिअरजेट ४५ हे विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन वैमानिक, पवारांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक आणि एक फ्लाइट अटेंडन्ट यांचा समावेश आहे.

अजित पवार हे बारामती येथे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी येत होते, मात्र वाटेतच त्यांच्या विमानाला अपघात झाला.

व्हीआरएस व्हेंचर ही कंपनी मुजफ्फरपुर येथील स्थानिक असलेले कॅप्टन व्ही. के. सिंग यांच्या मालकीची आहे. दरम्यान व्हीएसआर एव्हिएशनचे मालक व्ही. के. सिंग यांनी अपघातग्रस्त विमान हे पूर्णपणे सक्षम होते असे म्हटले आहे. तसेच विमानात कोणत्याही तांत्रिक बिघाडाची शक्यता देखील त्यांनी फेटाळून लावली आहे. या अपघाताची एव्हिएशन रेग्युलेटर्सकडून अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे.