Ajit Pawar Plane Crash Latest Update : बारामती येथे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चौघांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगितले आहे की, एएआयबी पथकाबरोबरच, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे एक तीन सदस्यांचे पथक अपघाताच्या दिवशी दुर्घटना स्थळावर दाखल झाले होते. एएआयबीचे डायरेक्टर जनरल यांनी देखील लिअरजेट ४५ विमान कोसळले त्या ठिकाणाला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.
“तपास वेगाने सुरू असून अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हा ताब्यात घेण्यात आला आहे,” असे मंत्रालयाने एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, “एक सखोल, पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण होणारी चौकशी केली जाईल याची काळजी घेणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर, ज्याला एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हणतात, हे ताब्यात घेण्यात आले आहे आणि याच्या माध्यमातून विमानाच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय झालं? याबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्याचे विश्लेषण केले जाईल.
तसेच मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एएआयबी नियम, २०२५ च्या नियम ५ आणि ११ नुसार तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ही चौकशी कठोर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या मुद्द्यांवर असणार भर
अधिकाऱ्यांनी सांगितले की तपासकर्ते हे दृश्यमानतेची स्थिती, वैमानिकाने घेतलेले निर्णय़ आणि बारामती येथील अनियंत्रित धावपट्टीवरील ऑपरेशनल लिमिटेशन्स हे चौकशीसाठी महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. बारामती येथे अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानाने लँडिंगचा दुसरा प्रयत्न केला असताना हा अपघात झाला.
एएआयबीच्या तज्ज्ञांचे एक पथक बुधवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी फॉरेन्सिक प्रक्रियेला सुरूवाक केली, ज्यामध्ये विमानाचे उरलेले अवशेष ताब्यात घेणे, पसरलेल्या अवशेषांचे मॅपिंग करणे आणि महत्त्वाचे पुरावे गोळा करणे याचा समावेश आहे.
तपास अधिकाऱ्यांनी विमानाची मालकी असलेल्या दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून विमानाचे एअरफ्रेम आणि इंजिन लॉगबुक्स, मेंटेनन्स रेकॉर्ड्स, इन्स्पेक्शनचा इतिहास, वर्क ऑर्डर्स आणि विमानात असलेली कागदपत्रे मागवली आहेत. तसेच क्रूच्या पात्रतेचे रेकॉर्ड्स आणि विमानाची सर्टिफिकेशन कागदपत्रे देखील डीजीसीएकडून मागवण्यात आली आहेत.
याबरोरच विमानाच्या अपघातावेळी अखेरीस घडलेला घटनाक्रम जाणून घेण्यासाठी एअर ट्राफिक कम्युनिकेशन रेकॉर्डिंग्ज, सीसीटीव्ही फुटेज, हॉटलाईन एक्सचेंजेस यांचे देखील विश्लेषण केले जात आहे.
VT-SSK अशी नोंदणी असलल्या या बिझनेस जेटने मुंबई-बारामती चार्टर विमान म्हणून उड्डाण केले होते. सकाळी ८:४४ च्या सुमारास या विमानाला अपघात झाला, ज्यामध्ये दोन वैमानिक आणि उपमुख्यमंत्र्यांसह तीन प्रवासी अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.
दुसर्यांदा लँडिंगच्या प्रयत्न अन्…
सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, विमान हे ८.१० मिनिटांनी मुंबईहून रवाना झाले आणि त्याचा सकाळी ८.१८ वाजता बारामती एअरफिल्डशी संर्क झाला. रनवे ११ वर पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न झाला, क्रूने रिपोर्ट केले की, त्यांना रनवे दिसत नाहीये आणि त्यानंतर स्टँडर्ड असलेली हवेतच एक फेरी मारण्यात आली.
परत एकदा विमानाने एअरफिल्डला कळवले की ते रनवे दिसू लागला की पुन्हा एकदा रिपोर्ट करतील. सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी विमानाला जमिनीवर उतरवण्याची परवानगी मिळाली, पण क्लिअरन्सचा कोणताही रिडबॅक मिळाला नाही. त्यानंतर एका मिनिटाने एअरफिल्ड अधिकाऱ्याला रनवेच्या टोकाला आगीचे लोट उठल्याचे दिसून आले, त्यानंतर आपत्कालिन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली.

