पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधानांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वसमावेशक विकास घडो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. “भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान होण्याचं भाग्य आपल्याला दोनदा लाभलं आहे. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड ही देशवासियांच्या विश्वासाचं, अपेक्षांचं प्रतिक आहे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करुन त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचं बळ आपणास मिळो,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात पवार यांनी म्हटलं आहे.

“पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व, संविधान, लोकशाही व्यवस्था अबाधित राहो. देशातील महागाई, बेरोजगारी, कोरोनासह आर्थिक, सामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करुन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात आपणास यश मिळो,” अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी मोदींना दिल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता होईल. महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासियांना समान न्याय, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचं काम आपल्याकडून होईल, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.

नक्की पाहा >> Birthday Special: सव्वा लाखांचं पेन, Apple गॅजेट्सबद्दलचं प्रेम अन् गॉगलची किंमत…; जाणून घ्या मोदींकडील महागड्या वस्तूंबद्दल

भाजपाकडून २१ दिवस साजरा होणार मोदींचा वाढदिवस

आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पार्टीने मोदींच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे.

नक्की वाचा >> #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हॅशटॅग चर्चेत; मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘जुमला’दिवस’चीही चर्चा

मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची यादी पाहूयात…

> नमो अ‍ॅपवरुन व्हर्चूअल प्रदर्शन भरवण्यात येणार.

> पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना १४ कोटी रेशनच्या पिशव्यांचं वाटप करण्यात येणार. हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी वितरण केंद्रावर जाऊन सहभागी होतील.

> पक्षाचे कार्यकर्ते रक्तदान शिबिरांचे आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करतील

> पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रितनिधींना लसीकरण केंद्रांवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत.

> प्रत्येक विभागामध्ये दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे.

> देशातील वेगवेगळ्या बागांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पाच कोटी शुभेच्छापत्र पाठवली जाणार.

> २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कर्यक्रमांच्या यादीत एक विशेष कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलाय.

> गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

> नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. देशभरातील ७१ ठिकाणी नद्या स्वच्छ केल्या जाणार आहेत.

> उत्तर प्रदेशमध्ये ७१ ठिकाणी गंगा स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे.

> अनाथ मुलांसाठी भाजपाकडून एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि महात्मा गांधींच्या जंयतीनिमित्ती विशे, कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेत.