नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नव्या पदाधिकार्‍यांच्या यादीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना डच्चू देऊन पक्षाचा संपूर्ण निधी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या माय-लेकरांनी हाती घेतला असून या खेळीमुळे पक्षाच्या आर्थिक नाड्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार कुटुंबीयांनी आता पकड मिळवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची नवी यादी २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली. या यादीमध्ये सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, पार्थ पवार राष्ट्रीय महासचिव, जय पवार राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पवार कुटुंबीयांतील पार्थ व जय या पदाधिकार्‍यांच्या कामाच्या वाटपामध्ये पार्थ पवार यांच्यावर पक्ष संघटनेमध्ये समन्वयाची जबाबदारी असेल. तर जय पवार राष्ट्रीय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष राहतील, त्याचबरोबर ते खजिनदाराची जबाबदारीही पार पाडतील. पक्षाच्या अन्य राष्ट्रीय पदाधिकार्‍यांकडेही विविध कामांचे वाटप करण्यात आले आहे. शिवाजीराव गर्जे यांचे खजिनदार पद कायम असले तरी त्यांच्याकडे मुख्यत्वे लेखापरीक्षण आणि हिशेबाचे काम देण्यात आले आहे. पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या कामाच्या नव्या वाटपामुळे पक्षाच्या आर्थिक निधीची सूत्रे पूर्णपणे पवार कुटुंबीयांच्या हाती आली असल्याचा दावा सूत्रांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही अधिकृत आर्थिक व्यवहारासाठी म्हणजेच बँकेत पैसे जमा करण्याचे वा काढून घेण्याचे अधिकार पक्षाच्या वतीने तीन पदाधिकार्‍यांना आहेत. यापूर्वी हे अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, राष्ट्रीय महासचिव व (पान ८ वर) (पान १ वरून) कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल व खजिनदार म्हणून वाय. पी. त्रिवेदी या तिघांकडे होते. या तिघांच्या स्वाक्षरीने पक्षाचे आर्थिक व्यवहार होत असत. आता नव्या पदाधिकार्‍यांच्या यादीमध्ये प्रत्यक्ष खजिनदाराचे काम जय पवार पाहणार आहेत. म्हणजेच पक्षाच्या अधिकृत आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार, राष्ट्रीय महासचिव म्हणून पार्थ पवार आणि खजिनदार म्हणून जय पवार या तिघांकडेच असतील, या तिघांपैकी एकाच्या स्वाक्षरीने बँकेचे व्यवहार केले जातील. नव्या बदलामध्ये राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून प्रफुल्ल पटेल वा वाय. पी. त्रिवेदी यांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे त्यांना पक्षाचे आर्थिक व्यवहार सांभाळता येणार नाहीत ही बाब केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या व आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या यादीतून स्पष्ट झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरही पक्षाची आर्थिक सूत्रे प्रफुल्ल पटेल यांच्याच ताब्यात होती. जोपर्यंत ही सूत्रे पटेल यांच्याकडे राहतील, तोपर्यंत पक्षावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येणार नाही ही बाब सुनेत्रा पवार व पार्थ पवार या माय-लेकरांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी पदाधिकार्‍यांची नवी यादी लपवून ठेवली व गुपचूप केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली, असा दावा केला जात आहे. राष्ट्रीय पदाधिकार्‍यांच्या नव्या नियुक्त्या व त्यांच्याकडे दिलेली कामांची जबाबदारी याचा थांगपत्ता प्रफुल्ल पटेल तसेच, सुनील तटकरे यांच्यासारख्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना नव्हता. पण, ही यादी जाहीर झाल्यामुळे पवार माय-लेकरांची खेळी उघड झाली. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या नियंत्रणातून पक्षाला बाहेर काढले असून आर्थिक सूत्रेही पटेलांच्या हातातून काढून घेतली आहेत, असाही दावा संबंधितांनी केला.

दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची भेट घेऊन कथित गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राष्ट्रीय पदाधिकार्‍यांच्या नव्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांना वगळून पवार कुटुंबातील तिन्ही सदस्यांना नेमके काय साध्य करायचे होते हे उघड झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या घडामोडींनंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असली, तरी प्रफुल्ल पटेल यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही वा त्यांनी कोणाची भेटही घेतलेली नाही. पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राज्यसभेतील खासदार असल्याने त्यांच्याकडून कोणत्याही राजकीय हालचाली वा बंडाची भूमिका घेतली जाणार नसल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवली गेली होती. त्याचीही अधिकृत माहिती प्रफुल्ल पटेल वा सुनील तटकरे यांना देण्यात आलेली नव्हती. या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची नावे असली, तरी त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा वा प्रदेशाध्यक्षपदाचा उल्लेख न करून पवार माय-लेकरांनी या दोन्ही नेत्यांना पक्षावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात भविष्यात टाकण्यात येणार्‍या संभाव्य पावलांचे संकेत दिले होते असे मानले जाते.

दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची भेट घेऊन कथित गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राष्ट्रीय पदाधिकार्‍यांच्या नव्या यादीतून प्रफुल्ल पटेल यांना वगळून पवार कुटुंबातील तिन्ही सदस्यांना नेमके काय साध्य करायचे होते हे उघड झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या घडामोडींनंतर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असली, तरी प्रफुल्ल पटेल यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतेही भाष्य केलेले नाही वा त्यांनी कोणाची भेटही घेतलेली नाही. पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राज्यसभेतील खासदार असल्याने त्यांच्याकडून कोणत्याही राजकीय हालचाली वा बंडाची भूमिका घेतली जाणार नसल्याचे समजते.