नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर विमान वाहतूक नियामक असलेल्या नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या चार विमानांवर (लिअरजेट ४०/४५) उड्डाणबंदीचे निर्देश दिले. देखभालीतील त्रुटी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. अपघातानंतर कंपनीचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, अलीकडे विमान अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षेबद्दल चिंता असताना ‘डीजीसीए’ने ‘नॉन-शेड्युल्ड ऑपरेटर’साठी (एनएसओपी), म्हणजेच मागणीप्रमाणे, लवचीक वेळापत्रकानुसार उड्डाण करणार्या विमान कंपन्यांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यानुसार, अशा विमान कंपन्यांनी नियमभंग केल्यास त्याचे दायित्व व्यवस्थापक व उच्चपदस्थांवर असेल. सुरक्षेमधील त्रुटींसाठी वैमानिकांना दोष देता येणार नाही, असे ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले.
अवैध उड्डाणे, माहितीच्या चुकीच्या नोंदी ओळखण्यासाठी कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरचे लेखापरीक्षण, ‘एडीएस-बी’ विदाची (डेटा) पडताळणी, इंधनाबद्दलच्या नोंदींची तपासणी यापुढे वाढवली जाईल. कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर विमानाचे वय, देखभाल इतिहास आणि वैमानिकांचा अनुभव यासारखी महत्त्वाची सुरक्षा माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक राहील. सर्व ‘एनएसओपी’ संस्थांची सुरक्षा क्रमवारी तयार करून ती ‘डीजीसीए’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

