नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत विमान अपघात तपास यंत्रणेने (एएआयबी) २२ पानी प्राथमिक अहवाल शनिवारी जाहीर केला. या अहवालात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अनियंत्रित विमानतळांवर ‘दृश्य उड्डाणांचे निकष’अंतर्गत (व्हीएफआर) उड्डाण करणाऱ्या सर्व कंपन्यांना निर्धारित मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे.
या अपघाताबाबतची वस्तुस्थिती, अपघात होण्यामागचे मूळ कारण याबद्दलची माहिती जाहीर करण्यात येईल. आतापर्यंत समोर आलेल्या अंतरिम निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर विमान सुरक्षेत वाढ करण्यासाठी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबवता यावेत यासाठी काही सुरक्षेच्या संदर्भात शिफारसी जारी करण्याची गरज असल्याचे ‘एएआयबी’ने नमूद केले आहे.
अनियंत्रित विमानतळांवरील हवाईसेवा सांभाळणाऱ्या सर्व विमानतळ संस्थांना देखील आवश्यक निर्देश द्यावेत, जेणेकरून संबंधित ‘डीजीसीए’ नियमांमध्ये नमूद निकषांनुसार प्रचलित हवामान परिस्थिती अनुकूल असेल तेव्हाच सर्व प्रकारच्या विमानांच्या उड्डाणांना परवानगी दिली जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
२८ जानेवारी रोजी सकाळी खराब दृश्यमानतेमुळे ‘गो-अराउंड’ केल्यानंतर लिअरजेट विमानाला बारामती येथे लँडिंगसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र परवानगी मिळाल्यानंतर विमानाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला कोणताही ‘रीड-बॅक’ संदेश देण्यात आला नाही आणि काही क्षणांतच धावपट्टीच्या कडेला विमानाला आग लागली. ‘यानंतर विमानातून ‘ओह शट, ओह शट असा संदेश प्रसारित झाल्याचे ऐकू आले. त्यानंतर धावपट्टी क्रमांक ११ च्या विशिष्ट मर्यादेजवळ डाव्या बाजूस विमान कोसळले,’ असे अहवालात नमूद आहे. विमानतळावरील धावपट्टीच्या कडेला केवळ २०० मीटर अंतरावर हे विमान कोसळले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सुमारे १५ हजार तास उड्डाणाचा अनुभव असलेले कॅप्टन सुमित कपूर, दीड हजार तासांचा अनुभव अनुभव असलेल्या सह पायलट शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि सहाय्यक पिंकी माली यांचा मृत्यू झाला होता.
