२८ जानेवारीच्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. या अपघातात आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. कॅप्टन सुमित कपूर हे या विमानाचे वैमानिक होते त्यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मुलीने एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे.
सुमित कपूर यांच्या मुलीची पोस्ट काय आहे?
कॅप्टन सुमित कपूर यांची मुलगी सान्या कपूरने ही पोस्ट लिहिली आहे. कॅप्टन सुमित कपूर हे लेयअरजेट ४५ चे वैमानिक होते. तिने लिहिलं आहे की, “मला आजही ठाऊक नाही की मी काय लिहिते आहे. मी प्रार्थना करते आहे आणि वाटतं आहे की चमत्कार व्हावा आणि तुम्ही हे वाचावं. एखाद्या वाईट स्वप्नातून जाग यावी तसं हे आहे, मला हे स्वप्न बघायचं नाही. मला अजूनही वाटतं तुमचा फोन येईल आणि तुम्ही विचाराल की कुठे आहे माझी झाशीची राणी? पपा माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे. मी कायम तुमची परी राणी बनून राहणार आहे. तुम्ही आकाशावर राज्य करण्यासाठीच जन्माला आला होतात. त्याच आकाशात तुम्ही शेवटचा श्वास घेतलात. तुम्ही एक उत्तम पिता, उत्तम पायलट आणि खूप चांगला माणूस होतात. तुम्ही खूप लवकर गेलात.” अशी पोस्ट सान्या कपूरने वडिलांसाठी लिहिली आहे.
सान्या कपूरची ही पोस्ट डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी
सान्या कपूरने लिहिलेली पोस्ट वाचून कुणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या पाचजणांमध्ये सुमित कपूर यांचा समावेश होता. सुमित कपूर यांच्या जाण्याने कपूर कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुमित कपूर यांच्या मुलीला अजूनही विश्वास बसत नाहीये की तिचे वडील या जगात नाहीत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्रांनी काय माहिती दिली?
कॅप्टन सुमित कपूर यांच्या मित्रांनी सांगितल्यानुसार अजित पवारांना घेऊन जे विमान बारामतीला जाणार होतं त्या विमानाचं उड्डाण करण्याची जबाबदारी कंपनीने दुसऱ्या एका वैमानिकावर सोपवली होती. सुमित कपूर हे ते विमान चालवणार नव्हते. मात्र अजित पवारांना बारामतीला घेऊन जाण्याची जबाबदारी ज्या वैमानिकावर होती तो वेळेवर पोहचू शकला नाही. वाहतूक कोंडीत तो अडकला त्यामुळे सुमित कपूर यांना तुम्ही अजित पवारांना घेऊन बारामतीला जा हे सांगण्यात आलं आणि अशा रितीने सुमित कपूर हे त्या विमानाचे वैमानिक म्हणून आले अशी माहिती सुमित कपूर यांच्या मित्रांनी दिली

