महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या विमानाच्या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर या विमान दुर्घटनेची चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अजित पवार ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते त्या व्हीएसआर व्हेंचर्सच्या विशेष ऑडिटचे आदेश दिले आहेत.
अजित पवार हे लिअरजेट ४५ एक्सआर या विमानाने मुंबईहून बारामती येथे जात होते. मात्र बारामती विमानतळावर लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नावेळी विमान कोसळले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह इतर चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.
डीजीसीएने आदेश देलेल्या ऑडिटचा अहवाल १५ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणे अपेक्षित असून यामध्ये कंपनीच्या कामकाज आणि लॉगबुक्सची चौकशी केली जाईल. याच्या माध्यमातून कंपनीकडून विमानाची योग्य देखभाल केली जात होती का? आणि प्रोटोकॉलप्रमाणे लॉगबूक भरले जात होते का हे तपासले जाईल. याच बरोबर एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कोणत्या परिस्थितीमुळे ही दुर्घटना घडली त्या कारणांचा तपास करत आहे.
युरोपियन यूनियननेही केली होती कारवाई
युरोपियन यूनियनची विमान वाहतूक नियमन करणारी संस्था युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (EASA) व्हीएसआर व्हेंचर्सला त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश नाकारला होता, अशी माहिती डीजीसीएने एका निवेदनात दिली आहे. EASA ही संस्था त्यांच्या हद्दीत ऑपरेट करणाऱ्या युरोपियन यूनियनच्या बाहेरील विमान कंपन्यांना प्रमाणित करण्याचे काम करते.
१४ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या लिअरजेट ४५ (tail No. VT-DBL) या विमानाच्या अपघाताबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर ही कंपनी उत्तर देऊ शकली नव्हती. त्यानंतर EASA ने व्हीएसआर व्हेंचर्सचे थर्ड कंट्री ऑपरेटर (TCO) ऑथोरायजेशन स्थगित केले होते, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.
ईयू एजन्सीकडून व्हीएसआर व्हेंचर्सला टीसीओ ऑथरायजेशन २०२० मध्ये मिळाले होते. मात्र सप्टेंबर २०२३ मद्ये झालेल्या अपघातानंतर EASA ने २०२४ मध्ये या अपघाताबद्दलची विशिष्ट माहिती मागीतली होती, जी कंपनीने कधीही दिली नाही. त्यानंतर १७ डिसेंबर २०२४ मध्ये EASA ने या कंपनीचे ऑथरायजेशन रद्द केले आणि त्यानंतर एका वर्षानंतर ते पुन्हा बहाल करण्यात आले.

