महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर आता देशभरात चर्चा सुरू झालीये ती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची. भाजपाकडे या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ असलं, तरी देखील विरोधी पक्षांनी मिळून यशवंत सिन्हा यांच्या पाठिशी आपलं बळ उभं केलं आहे. त्यामुळे ही लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर मुर्मू आणि सिन्हा यांच्यासाठीच्या समर्थन आणि विरोधाचं राजकारण सुरू झालेलं असताना काँग्रेस नेते अजोय कुमार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. अयोय कुमार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात एएनआयशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर अजोय कुमार यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व! द्रौपदी मुर्मू एका दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतात, असं अजोय कुमार म्हणाले आहेत. "हे सगळं द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत नाहीये. यशवंत सिन्हा हे देखील एक चांगले उमेदवार आहेत आणि द्रौपदी मुर्मू देखील चांगल्या व्यक्ती आहेत. पण त्या भारतातील एका दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करत आहेत. आपण त्यांना आदिवासींचं प्रतीक बनवता कामा नये", असं अजोय कुमार यावेळी म्हणाले. "अशा प्रकारे प्रतिकं तयार करून भारतीय लोकांना मूर्ख बनवणं हेच तर मोदी सरकारचं काम आहे. ही निवडणूक म्हणजे देशाच्या आत्म्यासाठीचा लढा आहे. त्यामुळे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन यशवंत सिन्हा यांना मतदान करायला हवं", असं देखील कुमार यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शिदें गटाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “आम्हाला अभिमान, त्यांनी…” "रामनाथ कोविंद 'तेव्हा' काहीच म्हणाले नाहीत" दरम्यान, यावेळी बोलताना अजोय कुमार यांनी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर देखील टीका केली. "आपले सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. दरम्यानच्या काळात हथरससारखी घटना घडली. पण त्यांनी त्यावर एका शब्दानंही प्रतिक्रिया दिली नाही. देशात अनुसूचित जातींची परिस्थिती अजूनच वाईट झाली आहे", असं कुमार यांनी नमूद केलं.