scorecardresearch

आकार पटेल यांची माफी मागा!; चुकीच्या कारवाईमुळे न्यायालयाचे सीबीआयला निर्देश

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’चे माजी प्रमुख आकार पटेल यांच्याविरोधातील ‘लूकआऊट सक्र्युलर’ मागे घेऊन त्यांची माफी मागण्याचे निर्देश दिल्लीतील न्यायालयाने गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिल़े. 

पीटीआय, नवी दिल्ली : ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया’चे माजी प्रमुख आकार पटेल यांच्याविरोधातील ‘लूकआऊट सक्र्युलर’ मागे घेऊन त्यांची माफी मागण्याचे निर्देश दिल्लीतील न्यायालयाने गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिल़े. 

 परदेशी अनुदान नियमन कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपावरून सीबीआयने आकार पटेल यांच्याविरोधात बुधवारी कारवाई केली होती़  पटेल हे बंगळुरू विमानतळावरून अमेरिकेला जाण्यासाठी निघालेले असताना सीबीआयने त्यांना प्रवासास मनाई केली़  त्याविरुद्ध त्यांनी दिल्लीतील न्यायालयात दाद मागितली. आपल्याविरुद्धची ‘लूकआऊट नोटीस’ रद्द करण्याची मागणी पटेल यांनी केली. ही नोटीस योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे बजावण्यात आलेली नसून, मनमानी कृत्य असल्याचेही पटेल यांनी याचिकेत नमूद केले होते. पटेल यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क, मिशिगन, बर्कले विद्यापीठांत विविध व्याख्याने, परिसंवादात सहभागी व्हायचे होते. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी पवनकुमार यांनी बुधवारी सीबीआयला नोटीस बजावली होती़

 या प्रकरणावर गुरुवारी न्यायालयाने सीबीआयला धारेवर धरल़े  या कारवाईतील चुकांची जबाबदारी स्वीकारून सीबीआय संचालकांनी पटेल यांची लेखी माफी मागावी, असे निर्देश देताना न्यायालयाने या माफीनाम्यामुळे जनतेचा सीबीआयवरील विश्वास अबाधित राहील, असे नमूद केल़े 

पटेल यांना प्रवासास मनाई करण्यात आल्याने आर्थिक नुकसानीबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागला आह़े  आर्थिक नुकसानीबाबत याचिकाकर्ते न्यायालय किंवा अन्य मंचाकडे दाद मागू शकतात़  मात्र, कारवाईतील चूक लक्षात घेऊन सीबीआयने पटेल यांची माफी मागायलाच हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केल़े  या प्रकरणात पटेल हे चौकशीत सहकार्य करत होत़े  तसेच त्यांच्याविरोधात कोणतेही वॉरंट प्रलंबित नव्हते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधल़े.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akar patel apologizes court directs cbi instructions ysh

ताज्या बातम्या