समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातल्या कार्सचा अपघात झाला आहे. या कार्समध्ये चार कारचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. अखिलेश यादव हरपालपूर या बैठापूरमध्ये एका लग्न समारंभासाठी गेले होते. त्यावेळी खेमीपूर गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेनंतर काही व्हिडिओही समोर आले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु झालं आहे. या ठिकाणी अँब्युलन्सही आल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार रस्त्यावर अचानक काहीतरी समोर आलं होतं. त्यामुळे एका गाडीने जोरात ब्रेक लावला. त्यानंतर एक कार दुसऱ्या कारला धडकली, त्यानंतर एका पाठोपाठ कार धडकल्या आणि त्यानंतर हा अपघात झाला. अखिलेश यादव यांचा एक दिवसीय दौरा आधीपासून ठरला होता. सकाळी ११ वाजता लखनऊतल्या हरदोईमधून निघाले होते. ४.३० ला लखनऊला त्यांना परत पोहचायचं होतं.
याआधी गुरूवारी अखिलेश यादव यांचा मुरादाबाद दौरा चर्चेत होता. समाजवादी पार्टीने आरोप केला होता की योगी सरकारच्या दबावात येऊनच आयुक्त आणि डीएम मुरादाबादमें अखिलेश यादव यांचं विमान लँड करायला संमती दिली नव्हती.
अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष हा स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यामुळे टीकेचा धनी ठरतो आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानस मधल्या काही ओळींवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांना विरोधही करण्यात आला. अशात नव्या कार्यकारिणीत स्वामी प्रसाद मौर्य यांना महासचिव पद देण्यात आलं. त्यामुळे भाजपाने आणखी तीव्र विरोध दर्शवला आहे. रामचरितमानसचा अपमान केल्याने स्वामी प्रसाद मौर्य यांना हे पद बहाल केलं गेलं असंही भाजपाने म्हटलं आहे.