Dhurandhar 2 Movie News Akhilesh Yadav Statement: SP Chief calls the Ranveer Singh starrer a political tool : सध्या धुरंधर-२ हा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मात्र या चित्रपटावरून भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘धुरंधर-२’ सारखे चित्रपट हे विरोधी पक्षांची बदनामी करण्यासाठी पैसे देऊन तयार केले जात असल्याचे म्हटले आहे.

लखनौमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले, “तुम्ही लोक दुसर्‍या पक्षांना बदनाम करण्यासाठी पैसे देऊन चित्रपट बनवत आहात, मला वाटतं, यांच्याकडे जास्तच पैसा पोहचत आहे.”

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून यश मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे हे विधान आले आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा मुख्य भूमिकेत असून या चित्रपटात आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे कलाकार देखील आहेत. हा चित्रपट आदित्य धर यांच्या २०२५ मधील ‘धुरंधर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे आणि तो गेल्या गुरुवारी प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शीत झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात ७०० कोटी रुपयांच्या जवळपास गल्ला जमवला आहे. यापैकी जवळपास ४५० कोटी रुपये हे या चित्रपटाने देशात कमावले आहेत.

‘धुरंधर २’ मध्ये दाखवण्यात आलेल्या ‘आतिफ अहमद’ नावाच्या पात्रामुळे अनेकांचे या चित्रपटाकडे लक्ष वेधले गेले आहे. हे पात्र वास्तविक जीवनातील गँगस्टर आणि राजकारणी अतिक अहमद याच्यावरून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. १५ एप्रिल २०२३ रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना, कॅमेऱ्यासमोर अतिक अहमदची अगदी जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘धुरंधर २’ या चित्रपटामध्ये हा थरारक प्रसंग दाखवला आहे.

न्यूज१८च्या रिपोर्टनुसार, चित्रपटात अतिक हे नाव बदलून ते ‘आतिफ अहमद’ असे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात असा दावा करण्यात आला आहे की, हा माफिया डॉन पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) आणि लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात होता. तसेच भारतात शस्त्र आणि बनावट नोटा आणण्यात देखील त्याचा हातभार होता.

अतिक अहमदचा अलाहाबाद आणि जवळपासच्या परिसरात मोठा प्रभाव होता. तो पाच वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. १९९६ मध्ये अतिक अहमद सपाकडून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला. तीन वर्षांनंतर त्याने अपना दल पक्षात प्रवेश केला आणि २००२ साली पुन्हा निवडणुकीत विजय मिळवला. २००४ साली पुन्हा सपामध्ये प्रवेश करून अहमदने ‘फुलपूर लोकसभा’ मतदारसंघातून विजय मिळवला. (या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व एकेकाळी जवाहरलाल नेहरू यांनी केले होते) मात्र २००४ साली घडलेल्या राजू पाल प्रकरणानंतर अतिक अहमदच्या गुन्हेगारी आणि राजकीय कारकिर्दीला खिळ बसली. अतिकने २०१९ साली नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत अवघी ८५५ मते मिळवून त्याचा लाजिरवाणा पराभव झाला होता.