उत्तरप्रदेशला आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निमित्ताने अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. सर्वच नेते आता पक्षसंघटन आणि रणनीती आखण्यात व्यस्त झालेले दिसत आहेत. अशातच आता मुसलायम सिंह यादवांच्या परिवारात एकी होणार का? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. कारणही तसंच आहे. अखिलेश यादव यांनी या युतीचे संकेत दिलेले आहेत.

अखिलेश यादव यांना आपले काका शिवपाल सिंह यांच्यासोबत युती करण्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, सगळ्याच छोट्या पक्षांना सोबत घेतलं जाईल. काकांचाही एक पक्ष आहे. तोही सोबत घेण्याचे प्रयत्न केले जातील. काकांना योग्य तो मान दिला जाईल. समाजवादी पक्षाचे लोक त्यांना अधिकाधिक मान देतील. निवडणुकीत त्यांनाही सोबत घेण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहील.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अखिलेश यादव म्हणाले, भाजपा द्वेषाचं राजकारण करत आहे. ते फक्त याच शोधात आहेत की कधी एखादा नवा मुद्दा मिळतोय. भाजपावाले विकास, रोजगार याबद्दल बोलतच नाहीत. अखिलेश यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यासंदर्भाने ते बोलले. अखिलेश पूर्वी म्हणाले होते, सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, बॅरिस्टर जिन्ना हे सगळे एकाच संस्थेत शिकून आले होते. एकत्रच शिकून बॅरिस्टर झाले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांना कोणत्याही प्रकारचा संघर्ष करावा लागला तरी ते मागे हटले नाहीत. या विधानामुळे भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला.