Al Falah University Membership Cancellation: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर चौकशीच्या फेऱ्यात आलेल्या अल फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची घोषणा भारतीय विद्यापीठ संघटनेने केली आहे. भारतीय विद्यापीठ संघटनेचे सरचिटणीस पंकज मित्तल म्हणाले, “भारतीय विद्यापीठ संघटनेच्या उपनियमांनुसार, सर्व विद्यापीठांना तोपर्यंतच सदस्य मानले जाते, जोपर्यंत ते नियमांचे पालन करत असतात.”
पंकज मित्तल म्हणाले की, “आमच्या लक्षात आले आहे की, हरियाणातील फरीदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाने संघटनेच्या नियमांचे पालन केले नाही, म्हणून त्यांचे भारतीय विद्यापीठ संघटनेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात येत आहे.”
मित्तल यांनी सांगितले की, अल फलाह विद्यापीठ आता भारतीय विद्यापीठ संघटनेचे नाव किंवा लोगो वापरू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी भारतीय विद्यापीठ संघटनेचा लोगो विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवरून काढून टाकावा.
फरीदाबादमधील धौज गावात असलेले अल फलाह विद्यापीठ एका व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहे. या प्रकरणातील विद्यापीठाशी संबंधित तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ही एक खाजगी संस्था आहे ज्याच्या कॅम्पसमध्ये एक रुग्णालय देखील आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर चर्चेत आलेल्या अल फलाह विद्यापीठाच्या सर्व नोंदींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सरकारने अंमलबजावणी संचालनालय आणि इतर आर्थिक तपास संस्थांना संस्थेतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हे निर्णय घेण्यात आले.
हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली जी कार स्फोटात वापरली गेली, ती फरीदाबाद येथील विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. उमर नबी चालवत होता. तपास यंत्रणेला सुरुवातीलाच संशय आला होता की बॉम्बस्फोट करणारा व्यक्ती डॉक्टर उमर होता, ज्याने स्फोटाच्या फक्त ११ दिवस आधी हल्ल्यात वापरलेली पांढरी हुंडई आय२० खरेदी केली होती. काश्मीरच्या पुलवामा येथील त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे घेतलेले डीएनए नमुने नंतर कारमधून सापडलेल्या मानवी अवशेषांशी जुळले, ज्यामुळे हे स्पष्ट झाले की डॉक्टर उमर हा स्फोट झाला तेव्हा हुंडई आय२० चालवत होता. याचबरोबर तपास यंत्रणांनी विद्यापीठाशी संबंधित तीन डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे.
