पीटीआय, जेरुसलेम : ‘अल-जझीरा’ या वाहिनीच्या प्रख्यात पत्रकार शिरीन अबु अकला यांचा बुधवारी पश्चिम किनाऱ्यावरील जेनिन शहरात इस्रायली सैनिकांच्या कारवाईदरम्यान मृत्यू झाला. पॅलेस्टिनी अ‍ॅथॉरिटी (पीए) आणि कतार येथील ही दूरचित्रवाहिनी यांनी या मृत्यूसाठी इस्रायली सैन्याला दोषी ठरवले आहे.

जेरुसलेम येथे राहून ‘अल-जझीरा’ साठी काम करणाऱ्या ५१ वर्षांच्या पत्रकार शिरीन यांना गोळीबारादरम्यान डोक्यात गोळी लागून त्या मरण पावल्या, असे पॅलेस्टिनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. ‘अल- कुद्स’ वृत्तपत्राचे वार्ताहर अली सामोदी यांच्या पाठीवर गोळी लागली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचीही माहिती त्यांनी दिली. अबु अकला यांनी प्रेस जाकीट व शिरस्त्राण घातले होते, मात्र हेल्मेटने न झाकल्या गेलेल्या कानाखालील भागात त्यांना गोळी लागली, असे या दृश्याच्या फुटेजमध्ये दिसले. आपण या पत्रकाराला लक्ष्य केल्याचे नाकारताना, सत्य शोधून काढण्यासाठी ‘संयुक्त रोगनिदान विश्लेषण व तपास’ करण्याचे आवाहन इस्रायली लष्कराने केले.

‘दहशतवादाच्या संशयितांना’ पकडण्यासाठी इस्रायली सैनिक जेनिनच्या निर्वासित तळासह पश्चिम किनाऱ्यावरील इतर अनेक ठिकाणी कारवाई करत होते, असे लष्कराने सांगितले. इस्रायली संरक्षण दलांच्या सांगण्यानुसार, या छाप्यादरम्यान दहशतवाद्यांनी इस्रायली फौजांवर गोळीबार केला आणि स्फोटके फेकली. यानंतर सैनिकांनी गोळीबाराने त्याचे प्रत्युत्तर दिले. पॅलेस्टिनी बंदूकधाऱ्यांनी झाडलेल्या गोळय़ा पत्रकारांना लागल्या असाव्यात ही शक्यता इस्रायली संरक्षण दले पडताळून पाहात असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.