वॉशिंग्टन : कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेच्या हवाई (ड्रोन) हल्ल्यात ठार झाला. अल-जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेवरील ‘९-११’ च्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा देत म्हंटले, की जवाहिरी शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेने (सीआयए) काबूलमध्ये केलेल्या ‘ड्रोन’ हल्ल्यात मारला गेला. त्याच्या मृत्यूमुळे न्याय मिळाला. लादेनच्या मृत्यूनंतर सुमारे ११ वर्षांनी जवाहिरी मारला गेला. अफगाणिस्तानात दोन दशके सैन्य ठेवून अमेरिकेने ११ महिन्यांपूर्वी सैन्य माघारी घेतले होते. आता अफगाणिस्तानातच एका महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेला हे यश मिळाले. ‘अल कायदा’चा संस्थापक ओसामा बिन लादेनला २ मे २०११ रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या गुप्त मोहिमेत ठार करण्यात आले. लादेनच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून जवाहिरी ‘अल-कायदा’चा नेता बनला. बायडेन यांनी सोमवारी संध्याकाळी ‘व्हाईट हाऊस’मध्ये संबोधनात सांगितले, की जवाहिरीचे अस्तित्व कायमचे संपुष्टात आणण्यासाठी मी या हल्ल्याला परवानगी दिली होती.

अनेक दशकांपासून त्याने अमेरिकी नागरिकांवर अनेक हल्ल्यांचे कट रचले होते. त्याच्या मृत्यूने आता त्यांना न्याय मिळाला आहे. जगाला आता भविष्यात या नरसंहारक दहशतवाद्याची भीती बाळगण्याची गरज नाही.

हा हल्ल्यातील यशामागे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाची असाधारण चिकाटी आणि कौशल्य असल्याचे सांगून बायडेन म्हणाले, की आमच्या गुप्तचर यंत्रणेने या वर्षांच्या सुरुवातीला जवाहिरीला शोधून काढले. तो काबूलला त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेला होता. २००१ च्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना जवाहिरीच्या मृत्यूने अखेर थोडा तरी दिलासा मिळाला. जवाहिरीने ऑक्टोबर २००० मध्ये एडनमधील ‘यूएसएस कोल’ युद्धनौकेवर आत्मघाती बॉम्बस्फोटासह इतर अनेक हिंसक घटनांचा कट रचला होता. या युद्धनौकेवरील १७ नौसैनिक त्या वेळी मृत्युमुखी पडले होते. केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन दूतावासांवर १९९८ मध्ये झालेल्या हल्ल्यातही जवाहिरीची मोठी भूमिका होती. इजिप्शियन शहर लक्सरमध्ये १९९७ मध्ये परदेशी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यातही जवाहिरीचा हात होता. ज्यात ६२ जण ठार झाले होते. इजिप्तच्या लष्करी न्यायालयाने १९९९ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. सुनावणीवेळी जवाहिरी तेथे उपस्थित नव्हता.

अल कायदा ते अल जिहाद

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरी इजिप्तमधील प्रतिष्ठित कुटुंबातील होता. त्याचे आजोबा राबिया अल-जवाहिरी कैरोच्या प्रतिष्ठित अल-अजहर विद्यापीठात इमाम होते. त्याचे एक नातेवाईक अब्देल रहमान आझम हे अरब लीगचे पहिले सचिव होते. सप्टेंबर २०१४ मध्ये जवाहिरीने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील सुरक्षित आश्रयस्थानांचा फायदा घेत भारतीय उपखंडात ‘अल-कायदा’ची शाखा स्थापन केल्याची घोषणा केली होती. तेव्हा त्याने सांगितले होते, की ‘जिहाद’चा झेंडा रोवण्यासाठी आणि भारतीय उपखंडात इस्लामिक राजवट परत आणण्यासाठी ‘अल कायदा’ची एक नवीन शाखा ‘अल कायदा अल जिहाद’ची स्थापना करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय नियमांचे स्पष्ट उल्लंघन : तालिबान

दरम्यान, तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले, की जवाहिरीला मारण्यासाठी अमेरिकेने केलेली कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे. अमेरिकेची अशी कृती गेल्या २० वर्षांचे त्यांचे अपयश अधोरेखित करते. अमेरिकेने सातत्याने अफगाणिस्तानच्या हिताच्या विरोधात पावले उचलली. तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी ‘ट्विट’च्या मालिकेत म्हटले आहे. या प्रवक्त्याला उद्धृत करत ‘बीबीसी’ने म्हंटले आहे, की काबूल शहरातील शेरपूर भागात ३१ जुलै रोजी हवाई हल्ला करण्यात आला होता. या घटनेची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. नंतर, इस्लामिक अमिरातीच्या सुरक्षा आणि गुप्तचर विभागाने या घटनेचा तपास केला आणि प्राथमिक तपासात असे आढळले, की एका अमेरिकन ‘ड्रोन’ने हवाई हल्ला केला.

झाले काय?

काबूलमधील एका घरात जवाहिरी आपल्या कुटुंबासह लपून बसला होता. जवाहिरी घराच्या सज्जात (बाल्कनी) असताना ‘ड्रोन’मधून दोन क्षेपणास्त्रे त्याच्यावर डागली गेली त्यात जवाहिरी मारला गेला.

थोडा इतिहास.. अमेरिकेवरील ‘९-११’च्या अमानुष हल्ल्याच्या नियोजनात अल-जवाहिरीची भूमिका होती. अमेरिकेच्या भूमीवर आतापर्यंत झालेल्या सर्वात घातक हल्ल्यात दोन हजार ९७७ अमेरिकी नागरिक मारले गेले होते.

आमच्या नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी अमेरिका कायमच वचनबद्ध राहील. कितीही वेळ लागला आणि कुठेही लपला असला तरी देशासाठी धोका ठरणाऱ्या व्यक्तीस अमेरिका शोधून काढेलच. – जो बायडेन, अमेरिकेचे अध्यक्ष