अफगाणिस्तानमध्ये तालिबानने मिळवलेल्या विजयासंदर्भात ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेनं तालिबानचं अभिनंदन केलं आहे. इतकच नाही तर ‘अल-कायदा’ने काश्मीर आणि अन्य काथकथित इस्लामीक भूभाग हा ‘इस्लामच्या शत्रूंच्या ताब्यातून मुक्त’ करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. तालिबानने अफगाणिस्तानला ‘पूर्ण स्वातंत्र्य’ मिळाल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांमध्येच ‘अल-कायदा’ने त्यांचं अभिनंदन करणारा संदेश जारी केलाय. ‘अल-कायदा’ने अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने घेतलेली माघार घेण्याचा संबंध हा कथाकथित इस्लामिक प्रदेशांना स्वातंत्र्य मिळवण्याशी जोडलाय. लेवंत, सोमाविया आणि येमेनलाही मुक्त करण्याबद्दल या दहशतवादी संघटनेनं तालिबानचं अभिनंदन करताना भाष्य केलं आहे.

‘अफगाणिस्तानमध्ये अल्लाहने मिळवून दिलेल्या विजयाबद्दल इस्लामिक उम्माचं अभिनंदन’ या मथळ्याखाली ‘अल-कायदा’ने संदेश जारी केलाय. “या अल्लाह लेवंत, सोमालिया, काश्मीर आणि अन्य इस्लामिक प्रदेशही शत्रूंच्या तावडीतून सोडवावा. या अल्लाह जगभरामध्ये मुस्लीम कैद्यांना स्वातंत्र्य मिळू देत,” असा उल्लेख या अभिनंदनाच्या संदेशात आहे. १६ ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवत अफगाणिस्तानवर संपूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर आता जगभरातील सुरक्षा यंत्रणांच्या संकेतानुसार तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याने दक्षिण आशियामधील सर्वच दहशतवादी संघटनांना नवीन ऊर्जा मिळाली असून घातापाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नक्की वाचा >> “…म्हणून अफगाणिस्तान सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता”; सैन्य माघार घेण्याचं कारण सांगताना बायडेन यांनी केला चीन, रशियाचा उल्लेख

फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबानदरम्यान झालेल्या शांतता करारामध्ये तालिबान सर्व दहशतवादी संघटनांशी असलेले त्यांचे संबंध संपुष्टात आणेल खास करुन ‘अल-कायदा’सोबत संबंध ठेवले जाणार नाहीत असं ठरवण्यात आलेलं. मात्र संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या गटाने जारी केलेल्या अहवालामध्ये असं काही घडलंच नसल्याचं म्हटलं आहे. तालिबानने ‘अल-कायदा’सोबतचे आपले संबंध तोडल्याचे कोणतेही पुरावे आढळून आलेले नसल्याचं या अहवालात म्हटलं होतं. “आम्ही सर्वशक्तिमान असणाऱ्यांचं (तालिबानचं) कौतुक करतो. त्यांनी खोटारडेपणाचं नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेचा अपमान करुन त्यांना पराभूत केलं. आम्ही अमेरिकेचं कंबंरडं मोडणाऱ्या आणि त्यांची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या तसेच अफगाणिस्तानच्या इस्लामिक भूमीचा अपमान करणाऱ्या अमरेकेला पराभूत करणाऱ्यांचं कौतुक करतो,” असं ‘अल-कायदा’ने म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video: अमेरिकेच्या लष्कराने देश सोडताच तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला मृतदेह लटकवून केलं उड्डाण

“अफगाणिस्तानची भूमी ही अनेक सम्राज्यांसाठी स्मशानभूमी ठरलीय. तसेच ही भूमी इस्लामसाठी कायमच विजयाचं प्रतिक राहिली आहे. अमेरिकेचा हा पराभव सुद्धा मागील २० वर्षांमध्ये तिसऱ्यांदा अफगाणिस्तानमधील शक्तींनी सम्राज्यवादी देशांना धूळ चारल्याचं अधोरेखित करतो,” असंही यात ‘अल-कायदा’ने म्हटलं आहे. ‘अमेरिकेच्या वाईट सम्राज्याचा पराभव’ हा जगभरातील पीडितांना प्रेरणा देण्यासाठी चांगला स्त्रोत आहे असं या संदेशात म्हटलंय. तसेच तालिबानचं नेतृत्व आणि खास करुन हैबतुल्लाह अखुंदजादाचं अभिनंदन करण्यात आलंय.

नक्की वाचा >> पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचं तालिबानला खुलं समर्थन, म्हणाला, “ते जबरदस्त…”

नक्की वाचा >> तालिबानला एकाकी झुंजणाऱ्या सालेह यांचा अफगाणिस्तान सोडणाऱ्या अमेरिकेला टोमणा; म्हणाले, “सुपर पॉवर म्हणवणाऱ्यांनी…”

विजय मिळवण्यासाठी जिहाद हा एकमेव मार्ग असल्याचं अफगाणिस्तानमधील तालिबानच्या विजयावरुन स्पष्ट होत असल्याचंही ‘अल-कायदा’ने म्हटलं आहे. तसेच पुढील संघर्षासाठी तयारी करण्याची वेळ आली असंही ‘अल-कायदा’ने या संदेशात म्हटलं आहे.