Al Qaeda Threat To US Flights and Dubai Flight Hijack Copycat Warning : अल-कायदाने अमेरिकन आणि इस्रायली विमानांवर हल्ले करण्याचं आवाहन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत तसंच फ्लाय दुबईच्या विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहवैमानिकाचे कौतुक करत अल-कायदाच्या समर्थकांनी हे आवाहन केल्याचं समोर आलं आहे. संबंधित सहवैमानिकाच्या सोशल मीडिया अकाउंटवर अल-कायदाच्या एका प्रमुख नेत्याचे फोटोही शेअर करण्यात आले होते. न्यू यॉर्क पोस्टने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
शुक्रवारी अल-कायदाच्या समर्थकांकडून सुरू करण्यात आलेल्या ‘अल-बयान’ या साप्ताहिकाच्या ताज्या अंकात हे आवाहन करण्यात आल्याचा दावा न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तात करण्यात आला आहे. अल बयानच्या या प्रकाशनात ९/११चा हल्ला आणि बुधवारी फ्लाय दुबईच्या FZ1073 या विमानावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न, या दोन्ही घटनांचा संदर्भ देण्यात आला.
युद्ध अजून संपलेलं नाही
“युद्ध अजून संपलेलं नाही. झायोनिस्ट, अमेरिकन आणि इस्लामविरोधात लढणारे इतर सर्व काफिर घेऊन जाणारी विमाने अजूनही आकाशात आहेत. ११ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबरला जे घडलं, त्याप्रमाणे त्यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं”, अशी धमकी या अरबी भाषेतील लेखात देण्यात आली. या लेखासोबत ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर विमान आदळतानाचे छायाचित्र आणि बुधवारी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या विमानावरील हल्ल्याचा संदर्भ देणारे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते.
“आज अमेरिका आणि झायोनिस्टांचे शत्रू पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आहेत. कदाचित देवावर विश्वास नसलेली एखादी व्यक्ती त्यांना लक्ष्य करेल आणि तिच्या या कारवाईचा शेवटी इस्लामला फायदा होईल”, असंही लेखात म्हटलं आहे. “अमेरिकेच्या दुष्ट साम्राज्याचा अंत होण्याचा दिवस येईल”, अशी धमकीही यात देण्यात आली. अल-कायदाशी संबंधित टेलिग्राम चॅनेलवर शनिवारी हा मजकूर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होता. मात्र, त्यानंतर तो हटवण्यात आला.
दहशतवादविरोधी तज्ज्ञ इव्हान कोलमन यांनी सुरुवातीला ‘द पोस्ट’शी बोलताना अल-कायदा समर्थक फ्लाय दुबईच्या घटनेचा आपल्या प्रचारासाठी फायदा घेत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, कथित सहवैमानिक हमाम अल-हम्मामीच्या सोशल मीडिया अकाउंटशी संबंधित सामग्री समोर आल्यानंतर या प्रकरणाला नवा पैलू मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. “जर हे अचूक असेल, तर तो कदाचित ISISचा समर्थक नसावा”, असं कोलमन म्हणाले. “माझ्या मते, या प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे हुमाम अल-बलावीचा उल्लेख”, असंही त्यांनी सांगितलं.
