सीरियाकडे असलेली रासायनिक शस्त्रास्त्रे नष्ट करण्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी आणि एक अब्ज डॉलर्स इतकी रक्कम लागेल, असे सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी म्हटले आहे. आपला देश नागरी युद्धाच्या नव्हे तर अल् कायदा पुरस्कृत परकीय बंडखोरांच्या आक्रमणाच्या खाईत असल्याचे असद यांनी नमूद केले. सुमारे एक लाख १० हजार जणांचा बळी घेणाऱ्या या हिंसाचारात जगभरातील ८० देशांमधील मूलतत्त्ववादी कार्यरत होते, असा आरोपही त्यांनी केला. सीरियाच्या सीमावर्ती भागावर अल कायदाशी संबंधित असलेल्या बंडखोरांनी पूर्ण वर्चस्व मिळवले असल्याच्या पाश्र्वभूमीवर असद यांनी हे विधान केले आहे.
अमेरिकेच्या ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत बशर अल असद यांनी सीरियाप्रश्नावर ‘मोकळे’ भाष्य केले. सीरियाला नागरी युद्धाने नव्हे तर अल कायदा पुरस्कृत परकीय घुसखोर हल्लेखोरांच्या हल्ल्यांनी ग्रासले असल्याचे त्यांनी सांगितले. २१ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या रासायनिक शस्त्रांच्या वापराविरोधात रशिया आणि अमेरिका यांची संयुक्त कारवाई करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी काढलेल्या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते. आपल्याकडील अत्यंत विध्वंसक अशी रासायनिक शस्त्रास्त्रे नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तांतरित करण्यास आपण तयार आहोत. मात्र खरोखरीच २१ ऑगस्ट रोजी दमास्कस आणि जवळील परिसरात करण्यात आलेल्या ‘सरीन’ हल्ल्याशी आपल्या सरकारचा काहीही संबंध नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला. आमची शस्त्रास्त्र नियंत्रण हस्तांतरित करण्याची तयारी आहे. त्या दृष्टीने सहकार्य करण्यास आपण तयार आहोत. मात्र अमेरिकेने लष्करी कारवाईची धमकी सातत्याने देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून त्यासाठी एका निश्चित वेळापत्रकाची गरज आहे. तसेच यासाठी सुमारे एक अब्ज डॉलर इतका खर्चही येऊ शकतो, असे असद यांनी स्पष्ट केले.

निरीक्षकांनी महत्त्वाचा पुरावा दुर्लक्षिल्याचा रशियाचा आरोप
२१ ऑगस्ट रोजी दमास्कस येथे झालेल्या नृशंस ‘सरीन’ वायू हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पथकाला दिलेला महत्त्वाचा पुरावा त्यांनी दुर्लक्षिला असल्याचा आरोप रशियाने केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षक पथकाचे प्रमुख एकी सेल्स्ट्रॉम यांना महत्त्वाचा पुरावा देण्यात आला होता, असी माहिती रशियाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री सर्जी रेबकॉव्ह यांनी दिली. संयुक्त राष्ट्रांनी मात्र रशियाने केलेले आरोप निराधार आणि बेताल असल्याचे म्हटले आहे.