Al-Qaeda Pakistan Military Threat: दहशतवादी संघटना ‘अल-कायदा’ने पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला थेट इशारा दिला आहे. लष्करी नेतृत्वावर टीका करताना अल कायदाने अफगाणिस्तान – तालिबान सरकारला पाठिंबा देण्याबाबत वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशातील संघर्ष ताणले असताना अल कायदाने पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला असून, अफगाणिस्तानला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

अल-कायदा आक्रमक

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या गेल्या दोन महिन्यांपासून संघर्ष वाढला आहे. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. यानंतर आता दहशतवादी संघटना ‘अल-कायदा’ आक्रमक झाली आहे. अल-कायदाकडून दोन पानी परिपत्रक काढण्यात आले असून, यात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत कडक इशारा दिला आहे. तसेच अफगाणिस्तानला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

अफगाणिस्तानला सहकार्याचे आश्वासन

पाकिस्तान लष्कर अमेरिकेच्या इशाऱ्यावरून अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारविरुद्ध काम करत आहे आणि सीमेवर तणाव निर्माण करत आहे, असा आरोप अल-कायदाने केला आहे. या गटाने पाकिस्तानला अफगाणिस्तानपासून दूर राहण्याचा इशारा दिला. संघटनेकडून अफगाणिस्तानला संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. अल कायदा पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने तालिबान सरकारला सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तालिबान सरकारची आणि त्यांची उद्दिष्टं सारखीच असल्याचे संघटनेने अधोरेखित केले.

पाकिस्तानी नागरिकांना आवाहन

अल कायदाने या परिपत्रकाच्या माध्यमातून पाकिस्तानी नागरिकांना देखील थेट आवाहन केले आहे. अल-कायदाने सशस्त्र दलांच्या सदस्यांसह नागरिकांना शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करण्याचे आवाहन केले. सोव्हिएत-विरोधी जिहादसारख्या भूतकाळातील संघर्षांशी जोडलेल्या ऐतिहासिक संबंधांचा आधार घेत, त्यांनी पाकिस्तानी नागरिकांना उपकारांची परतफेड करण्याचे आवाहन केले. दोन्ही देशातील संघर्ष वाढल्यानंतर अल कायदाने केलेल्या या वक्तव्याचे विविध अर्थ लावले जात आहेत.